स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी हॉस्पिटलची शक्कल

समाजातील वाढत्या स्त्री-भ्रूणहत्यांचे चित्र बदलण्यासाठी पुण्यातील एका हॉस्पिटलनं अगदी वेगळी शक्कल लढवली आहे. या हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाल्यास हॉस्पिटल आपलं बिल माफ करणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 1, 2013, 07:37 PM IST

नितीन पाटोळे, www.24taas.com, पुणे
समाजातील वाढत्या स्त्री-भ्रूणहत्यांचे चित्र बदलण्यासाठी पुण्यातील एका हॉस्पिटलनं अगदी वेगळी शक्कल लढवली आहे. या हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाल्यास हॉस्पिटल आपलं बिल माफ करणार आहे.
हडपसर परिसरातील मेडीकेयर हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी एखादी महिला ऍडमिट झाली आणि या महिलेला मुलगी झाली तर त्यांना हॉस्पिटलकडून विशेष गिफ्ट मिळणार आहे. हॉस्पिटल संबधित महिलेचं प्रसूतीचं संपूर्ण बिल माफ केलं जाणार आहे. हॉस्पिटलनं या अनोख्या निर्णयाची घोषणा केली आहे.
हॉस्पिटलमध्ये अनेक दांपत्य उपचारासाठी येतात. मात्र त्यांच्याकडून मागणी होते ती मुलाच्या जन्मासाठी उपचार करण्याची. ही बाब डॉ. राख यांना खटकली. मुलींच्या जन्माविषयी ठोस पावलं उचलयाला हवीत. याची जाणीव त्यांना झाली आणि यातूनच त्यांनी स्वत:च्या हॉस्पिटलमध्ये मुलगी झाल्यास प्रसूतीचा झालेला सगळा खर्च माफ करण्याची योजना सुरु केली.
मुलींवर होत असलेले अत्याचार,स्त्री-भ्रूणहत्या करण्यामध्ये डॉक्टरांचाच उघड होत असलेला सहभाग...अशा सर्व निराशाजनक वातावरणात मेडीकेयर हॉस्पिटल आणि डॉ. राख यांचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद म्हणावा असा आणि इतरांनी प्रेरणा घ्यावी असा आहे.