www.24taas.com, झी मीडिया, खालापूर
खालापूर गावाजवळील वनवे गावातील द्वारकाबाई गायकवाड यांना स्वत:च्याच नातवानं बेघर केल्याची घटना समोर आली आहे.
खालापूर या तालुका मुख्यालयाशेजारीच असणार्याा वनवे गावातील दलित कुटुंबातील द्वारकाबाई गायकवाड. त्यांचा मुलगा जगन्नाथ आणि नातू रवींद्र यांच्यात घरगुती कलहामुळे २४ डिसेंबरला वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की नातवानं आजीला मारहाण केली. या मारहाणीत द्वारकाबाई यांचा हात फ्रॅक्चर झाला. मारझोड करून घराबाहेर काढल्यानं द्वारकाबाईंना चिंचेच्या झाडाखाली राहण्याची वेळ आली आहे.
जगन्नाथ गायकवाड यांनी आपली आई द्वारकाबाई हिला दवाखान्यात नेलं असताना इकडं नातवानं द्वारकाबाई ज्या घरात राहत त्या घराची पूर्णत: मोडतोड केली. संपूर्ण घर उद्ध्वस्त केलं. इतकंच नव्हे, तर घरातील सामान नातवानं नेल्याचा आरोप वडील जगन्नाथ गायकवाड यांनी केला आहे. आता द्वारकाबाई या आपला मुलगा जगन्नाथसोबत चक्क चिंचेच्या झाडाखाली राहत आहेत.
रवींद्र यानं वडील राहत असलेलं घर नावावर करण्याची मागणी केली होती, असं जगन्नाथ गायकवाड यांनी सांगितलं. या मागणीला नकार देताच त्यानं हे कृत्य केल्याचं पीडित जगन्नाथ यांनी सांगितलं. मुलानं आजीला नाहक मारहाण करून संपूर्ण घराचं नुकसान करीत घरातील सामान स्वत:च्या रसायनी इथल्या खोलीवर नेल्याचंही जगन्नाथ म्हणाले.
या मारहाणीची तक्रार द्वारकाबाई यांनी खालापूर पोलिसांत दिली. परंतु पोलिसांनी केवळ एनसी दाखल करून घेतल्यानं पीडित द्वारकाबाई आणि जगन्नाथ गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घराचं नुकसान दोन-तीन महिन्यांपूर्वीचं आहे. व्दारकाबाईंना नातवानं मारलं असल्यास तसा गुन्हा दाखल होऊ शकतो.
व्हिडिओ पाहा -
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.