www.24taas.com, झी मीडिया, पुणे
ज्येष्ठ नाटककार आणि विचारवंत गोविंद पुरुषोत्तम देशपांडे उर्फ गो.पु. देशपांडे यांचे पुण्यात निधन झालंय. ते ७४ वर्षांचे होते. त्यांना जुलैमध्ये ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यानंतर ते कोमात होते.
पुण्यातल्या प्रयाग रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला होता. आज संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
संगीत नाटक अकदामी पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. उद्धवस्त धर्मशाळा, अंधारयात्रा, सत्यशोधक, अंतिम दिवस ही त्यांची नाटकं प्रसिद्ध आहेत. नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ‘सेंटर फॉर इस्ट एशियन स्टडीज’चे ते प्रमुख म्हणूनह त्यांनी काम पाहिले होते. संस्कृती आणि राजकारणावरचे वैचारिक लेखन, कविता, भारतीय भाषांमधल्या नाटकांच्या भाषांतरांचे संपादन, भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत लेखन अशी चौफेर कामगिरी त्यांनी केली होती.
अटलबिहारी वाजयपेयींच्या चीन दौऱ्यात दुभाषक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. पण, भारतातले एक आघाडीचे आणि नवी दृष्टी देणारे नाटककार ही त्यांची खरी ओळख होती. त्यांच्या निधनानं भारतीय नाट्यकलेला एक नवा आयाम देणारा सशक्त नाटककार हरपला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.