www.24taas.com,पुणे
अंत्यविधीसाठी नातेवाईक जमलेले, अंत्यविधीची तयारी सुरु आणि रुग्णालयातून आलेला मृतदेह दुसऱ्याच कोणा व्यक्तीचा असल्याच समोर आल्यावर काय घडेल? नातेवाईकांचा संताप अनावर झाल्याशिवाय रहाणार नाही.
शिवाजीनगर भागातील दिलीप कदम रुबी हॉलमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून डायलेसिसचे उपचार घेत होते. मात्र दुर्दैवाने शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. मुलाचा अभियांत्रिकी शाखेत तिस-या वर्षात शिकतोय. त्याचा शेवटचा पेपर असल्यानं त्याला याबाबत सुरवातीला सांगण्यात आलं नाही. पेपर संपून तो पुण्यात आल्यानंतर रुबी हॉलमधील कदम यांचा मृतदेह हॉस्पिटल कर्मचा-यांनी नातेवाईकांकडे सुपूर्द केला. मात्र घऱी आल्यानंतर एक वेगळाच धक्कादायक प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आला, तो म्हणजे हा कदम यांचा मृतदेह नसून दुस-याच कुणाचा असल्याचं लक्षात आलं.
दरम्यान कदम यांच्या घरी आलेला मृतदेह हा नाशिक च्या नितीन महाजन यांचा असल्याच स्पष्ट झालं. एकीकडे कदम यांच्या कुटुंबीयांना चुकीचा मृतदेह मिळाल्यान मनस्ताप होत होता तर दुसरी कडे रुबी हॉस्पिटलकडून महाजन कुटुंबियांना अत्यंत संवेदनाहीन वागणूक दिली जात होती. सुरुवातीचे दोन तास तर त्यांना मृतदेह बदलल्याच सांगितलंच नाही. त्यानंतर अत्यंतनिर्लज्जपणे रुग्णालयातील कर्मचा-यांनी कदम यांचा मृतदेह महाजन यांच्या कुटुंबियांना घेवून जाण्यास सांगितलं. हॉस्पिटल कर्मचा-यांनी सुरुवातीला टाळाटाळ करत अखेर झालेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. मात्र, प्रशासनाचा झालेला गलथानपणा कमी की काय आणखी एक कळस केला. तुम्ही रस्त्यातच एकमेकांचे मृतदेह ताब्यात घ्या, असा सल्ला हॉस्पिटल प्रशासनाने दिला. एकूणच झालेल्या प्रकाराने आधीच संतप्त नातेवाईकाच्या आणि मित्र परिवाराच्या संतापात यामुळे आणखीनच भर पडली...
एकूणच रुग्णालय प्रशासनाने कसलीही शहानिशा न करता मृतदेह ताब्यात दिलाच कसा, असा जाब आता विचारला जातोय. याबाबत प्रशासनाशी झी मीडियाच्या टीमने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथेही त्यांनी कसलीही प्रतिक्रिया देण्याची तसदी घेतली नाही. झाल्या प्रकाराचा आणि हॉस्पिटलच्या बेजबाबदारपणामुळे मृतांच्या कुटुंबीयांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला...