डॉ. दाभोलकरांच्या मारेक-यांचा तपास पिस्तुलाच्या दिशेने

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी मारेक-यांनी वापरलेलं पिस्तुल इचलकरंजीच्या मनीष रामविलास नागोरी उर्फ मन्या याच्याकडून विकत घेतलं असल्याचा संशय व्यक्त होतोय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 3, 2013, 01:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी मारेक-यांनी वापरलेलं पिस्तुल इचलकरंजीच्या मनीष रामविलास नागोरी उर्फ मन्या याच्याकडून विकत घेतलं असल्याचा संशय व्यक्त होतोय.
मन्या तसंच त्याच्या तीन साथीदारांना पुणे पोलिसांनी नुकतंच एका खून प्रकरणी अटक केलीय. त्यामुळे दाभोलकर हत्याप्रकरणाचे धागेदोरे सापडले असल्याचा जो दावा करण्यात येत होता त्यामध्ये तथ्य असण्याची शक्यता निर्माण झालीय. नागोरी हा अवैध शस्त्र विक्री करणा-या टोळीतील गुंड आहे. त्याला एटीएसनंही अवैध शस्त्रप्रकरणी अटक केली होती. तसंच त्याच्याकडून ४५ पिस्तुल जप्त केली होती. पुणे विद्यापीठातले रखवालदार प्रल्हाद जोगदंडकर यांच्या हत्येप्रकरणी तो सध्या पुणे पोलिसांच्या अटकेत आहे.
जोगदंडकर आणि दाभोलकर यांची हत्या एकाच प्रकारच्या पिस्तुलातून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. दाभोलकर यांची हत्या ७.६५ बनावटीच्या पिस्तुलानं झाली होती. त्यामुळे अशा प्रकारची पिस्तुलं बाळगणा-या मन्याकडूनच दाभोलकरांच्या मारेक-यांनी पिस्तुल विकत घेतलं असण्याची शक्यताय. या पार्श्वभूमीवर नागोरीनं कुणाला पिस्तुलं विकली होती, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.