www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड
मुंबईतल्या डॉकयार्ड इमारत दुर्घटनेमुळे असुरक्षित इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक इमारती धोकादायक आहेत. त्यावर कारवाईचे आदेश देण्यात आलेत. पण प्रत्यक्षात एकाही इमारतीवर कारवाई झालेली नाही.
ठाणे शिळफाटा इमारत दुर्घटनेनंतर पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेसी यांनी शहरातल्या धोकादायक इमारतींच ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये शहरातल्या ७४ धोकादायक इमारती पाडण्याचे आदेशही प्रशासनाला दिले. मात्र या इमारती पाडणं तर सोडाच शहरात सुरू असलेली अनधिकृत बांधकामांवरची कारवाईसुद्धा गेले काही दिवस बंद झालीय.
पिंपरी चिंचवडमध्ये नदी पात्रात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम झालीयत. निगडी मधली कर्मचारी वसाहत धोकादायक आहे. काही शाळा, रुग्णालयांच्या इमारती धोकादायक झाल्यात. नगररचना विभाग प्रमुख एम टी कांबळे नेहमीप्रमाणे माहिती नाही, असं उत्तर देतायत. तर आयुक्त बोलायला तयार नाहीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.