पिंपरी-चिंचवड महापालिकेची श्रीमंती टिकणार का?

अशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असा नावलौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला ही श्रीमंती टिकवण्याचं मोठ आव्हान सध्या निर्माण झालंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 2, 2013, 07:20 PM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
अशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असा नावलौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला ही श्रीमंती टिकवण्याचं मोठ आव्हान सध्या निर्माण झालंय. LBT च्या अंमलबजावणीमुळे पालिकेचं उत्पन्न घटणार की वाढणार हे इतक्यात कुणीही सांगू शकत नाही. जकातीतून कोट्यवधींचं उत्पन्न घेणा-या महापालिकेचं हे उत्पन्न टिकवण्याचं मोठं आव्हानआयुक्त श्रीकर परदेशी आणि कर संकलन विभाग प्रमुख अशोक मुंडे यांच्या समोर असणार आहे.
वेगानं विकास होणार शहर म्हणून पिंपरी-चिंचवड शहराचा लौकिक. थक्क करणारा विकास, चकचकीत रस्ते, महत्त्वाचे उद्योग यामुळे शहराला बेस्ट सिटीचा पुरस्कार प्राप्त झाला. आणि हे सर्व साध्य झालं ते पालिकेच्या भरघोस उत्पन्नामुळे. अर्थात हे उत्पन्न मिळत होतं जकातीतून. महापालिकेच्या जकात विभागाने वर्षाला तब्बल बाराशे कोटी रुपये कमावण्याची किमया साधली. पण हेच उत्पन्न LBT च्या माध्यमातून मिळवण्याचं मोठं आव्हान पालिकेसमोर आहे. यासाठी आयुक्त श्रीकर परदेशी आणि जकात विभाग प्रमुख अशोक मुंडे यांनी साथीने LBT च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वेळीच पावलं उचलायला सुरुवात केलीय. पहिले तीन चार महिने तोटा सहन करावा लागला तरी चार महिन्यातच पालिका अपेक्षित उत्पन्न मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

दुसरीकडे व्यापा-यांचा मात्र LBT ला विरोध कायम आहे. दुस-या दिवशीही पिंपरी-चिंचवडमधील बाजारपेठा बंदच होत्या. LBT लागू होणार याची पूर्ण कल्पना असल्यामुळे आयुक्त श्रीकर परदेशी यांनी कर संकलन विभागप्रमुख अशोक मुंडे यांच्या साथीने आधीपासूनच सर्व तयारी केली होती. पण व्यापा-यांच्या वाढत्या विरोधामुळे पालिकेचं उत्पन्न आहे तेच ठेवणं सध्या तरी शक्य होणार नाही. त्यामुळे या श्रीमंत महापालिकेच्या श्रीमंतीवर आणि पर्यायाने शहराच्या विकासाला याचा मोठा परिणाम होण्याची चिन्ह आहेत.