www.24taas.com, सोलापूर
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्या भैय्या देशमुखांविषयी बेताल वक्तव्य केलं, त्या भैय्या देशमुखांच्या पाटकुल गावानं गुढीपाडवा साजरा करण्यावर बहिष्कार घातलाय. गावातल्या एकाही नागरिकानं आपल्या घरी गुढी उभारलेली नाही.
उजनी धरणाचं पाणी दुष्काळग्रस्त सोलापूरला मिळावं यासाठी भैय्या देशमुख गेल्या 72 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करतायत. त्यांच्या आंदोलनाला ताकद मिळावी यासाठी सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या त्यांच्या पाटकुल गावातल्या गावक-यांनी गुढी पाडवा साजरा न करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत उजनी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याचे पाणी सोडण्याची देशमुखांची मागणी सरकार पूर्ण करत नाही तोपर्यंत गावकरी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचा निर्धारही गावक-यांनी व्यक्त केलाय.
तर समाजाच्या कल्याणासाठी आपण सदैव भैय्या देशमुखांच्या पाठिशी उभं राहणार असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलंय. 72 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. मात्र आता सरकारला कधी जाग येते? आणि उजनीचं पाणी कधी मिळतं? याकडेच भैय्या देशमुखांच्या पाटकुल गावाचं लक्ष लागलंय.