www.24taas.com , झी मीडिया, पुणे
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात पुरोगामी संस्था-संघटना आणि सर्वपक्षांच्यावतीनं बंद पुकारण्यात आलाय. त्याचबरोबर दाभोलकरांच्या हत्येचा निषेध म्हणून आज पुण्यातील रिक्षा सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
दाभोलकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज साताऱ्यातील वाय. सी. कॉलेजच्या सभागृहात सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी शोकसभेचं आयोजन केलंय. शिवाय हत्येचा निषेध करण्यासाठी आज सकाळी दहा वाजता पुणे महापालिका भवन ते महात्मा फुले मंडईपर्यंत निषेध मोर्चाही काढण्यात येणार आहे.
डॉ. दाभोलकर यांची काल सकाळी गोळ्या घालून हत्या झाल्यानंतर शहरातील पुरोगामी संस्था-संघटना तसंच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना धक्का बसलाय. या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज ‘पुणे बंद`चं आवाहन करण्यात आलंय. ही घटना अत्यंत धक्कादायक असून विवेकवादी, लोकशाही मूल्यांची हत्या करणारी आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि लोकशाही परंपरेला दहशतवादानं खंडित करण्याचा हा प्रयत्न सर्व पुरोगामी पक्ष आणि संघटना पूर्ण ताकदीनं हाणून पाडण्याचा निर्धार या बंदच्या माध्यमातून करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांनी सांगितलं.
अत्यावश्याक सेवा वगळता आज सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.