निर्णय घेतला `बाबां`नी, श्रेय घेतलं अजित `दादां`नी!

पिंपरी चिंचवडचे ‘दबंग’ आपणच असल्याचं अजित पवारांनी पुन्हा सिद्ध केलं आहे. पिंपरी चिंचवडमधल्या अनधिकृत बांधकामांना अभय देण्याचा निर्णय खरं तर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पार पडला. पण मुख्यमंत्री शहरात येण्यापुर्वीच दादांच्या आदेशानं राष्ट्रवादीच्या आमदारांनी याची घोषणा करुन टाकली आणि काँग्रेसला नुसतंच बघत बसण्याशिवाय पर्याय उरला नाही.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 8, 2013, 11:48 AM IST

www.24taas.com, पुणे
पिंपरी चिंचवडचे ‘दबंग’ आपणच असल्याचं अजित पवारांनी पुन्हा सिद्ध केलं आहे. पिंपरी चिंचवडमधल्या अनधिकृत बांधकामांना अभय देण्याचा निर्णय खरं तर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पार पडला. पण मुख्यमंत्री शहरात येण्यापुर्वीच दादांच्या आदेशानं राष्ट्रवादीच्या आमदारांनी याची घोषणा करुन टाकली आणि काँग्रेसला नुसतंच बघत बसण्याशिवाय पर्याय उरला नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतली श्रेयाची लढाई नवी नाही. पिंपरीतल्या अनधिकृत बांधकामासंदर्भात अजित पवारांनी अशी काही खेळी केली की काँग्रेसनं निर्णय घेऊनही त्याचं श्रेय घेण्याची काँग्रेसला सवडच मिळाली नाही. पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार हे तीनही दिग्गज शुक्रवारी विविध कार्यक्रमांसाठी एकत्र येत आहेत. त्यापूर्वीच मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि आयुक्त श्रीकर परदेसी यांची बैठक झाली. त्यात शहरातलं अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले. पण स्वतःच्या बालेकिल्ल्यासाठी झालेल्या निर्णयाचं श्रेय इतर कुणाला घेऊन देतील ते अजितदादा कसले!

मुख्यमंत्री येण्यापुर्वीच लक्ष्मण जगताप आणि विलास लांडे यांनी पत्रकार परिषेद घेऊन हा निर्णय जाहीर करून टाकला. त्यामुळे बावचळलेल्या कॉंग्रेसन आता राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका सुरु केली आहे. अजित पवारांच्या या खेळीमुळे काँग्रेसला श्रेय घ्यायची संधीच मिळाली नाही आणि बालेकिल्ल्यात आपणच दबंग असल्याचं अजित पवारांनी पुन्हा दाखवून दिलंय.