www.24taas.com, सातारा
वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कराडमध्ये गांधीगिरी सुरु केलीय. सामाजिक जीवनात जे काही घडलं त्याच प्रायश्चित घेण्यासाठी आपण येथे आलोय, असं सांगत अजित पवार कराडमध्ये दाखल झाले आहेत.
यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अजित पवार आज दिवसभर थांबणार आहेत, अशी माहिती आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवार यांना उपरती सुचलेय. आत्मक्लेश करण्यासाठी पवार चव्हाण यांच्या समाधीस्थळीजवळ बसणार आहेत.
जो काम करतो तो चुकतो. त्यामुळे आपल्या चुकीबद्दल प्रायश्चित घेण्याचे ठरविलेय. मला जे वाटले ते मी करण्यासाठी येथे आलोय. मला काही प्रसिद्धी मिळवायची नाही. नाहीतर मी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले असते. तसे मी केलेले नाही. आपल्या राजकीय जीवनात असं काहीतरी करावसं वाटल म्हणून मी कराडमध्ये आलोय, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.
दरम्यान, दुष्काळग्रस्तांबाबत अजित पवारांनी केलेलं वक्तव्य अयोग्यच असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कठोर शब्दात अजित पवारांचे कान उपटले. यापुढे अजित पवारांनी सांभाळून बोलावं, असा सल्लाही शरद पवारांनी दिलाय.
अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांबाबत केलेल्या बेताल वक्तव्यावरून आठवभरापासून वादळ उठलंय. मात्र शरद पवारांनी याबाबत मौन बाळगलं होतं. अखेर आठवड्याभरानंतर प्रतिक्रिया देऊन त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी असलेल्या आपल्या या पुतण्याचे चांगलेच कान टोचलेत. आता खुद्द शरद पवारांनीच दिलेल्या या कानपिचक्या बरंच काही सांगून जातात. सत्तेच्या खुर्चीवर विराजमान असलेल्या अजित पवारांसाठी ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. दुष्काळग्रस्तांबाबत केलेल्या असभ्य वक्तव्यावर राजीनामा द्यायचा की नाही, यारून उठलेल्या वादळावर आपले समर्थक आमदार निर्णय घेतील असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. मात्र, आमदार नव्हे तर पक्ष निर्णय घेईल, असं सांगत शरद पवारांनी अजितदादांना आणखी एक सणसणीत चपराक लगावलीयं.
एकूणच शरद पवारांचं हे वक्तव्य अजितदादांच्या महत्वाकांक्षेला वेसण घालणारं आहेच. त्याचबरोबर पक्षात माझाच शब्द अंतिम राहिल, असं ठणकावल्याने यापुढे अजितदादांना बरीच खबरदारी घ्यावी लागणार असं दिसतंय. त्यामुळे अजित पवारांनी गांधीगिरी सुरू केल्याचं म्हटलं जातंय.