अरूण मेहेत्रे, www.24taas.com, पुणे
पुण्यात सध्या प्रचंड होर्डिंगबाजी सुरू आहे. मात्र ही होर्डिंगबाजी जाहिराती किंवा नेत्यांच्या पब्लिसिटीसाठी नाही तर महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं यासाठीचा हा प्रयत्न आहे.
पुण्याचा सर्वांगिण विकास हवा असेल तर मतदान करा, शहरातल्या समस्यांपासून मुक्ती हवी असेल, तर मतदान करा, स्वार्थी आणि संधीसाधू राजकारणावर मतदान हाच शंभर टक्के उत्तर… पुण्यातल्या मतदारांना जागृत करण्यासाठी सगळीकडे अशी होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. निवृत्त प्रशासकीय अधिकारी, निवृत्त न्यायाधीश, उद्योजक आणि व्यावसायिकांच्या सहभागातून पुणे लोककल्याण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून पुणेकरांना मतदानाचं आवाहन करण्यात येत आहे.
पुणेकरांनीही या अभियानाचं स्वागत केलं आहे. कॉर्पोरेट क्षेत्रानंही यासाठी पुढाकार घेतला. सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो, सगळ्याच स्तरांमध्ये मतदानाबद्दल उदासीनता दिसून येते. अशा सगळ्यांनाच जागं करण्यासाठी शहरातून अंधांची रॅलीही काढण्यात येणार आहे. त्यामुळे स्वतःला सूज्ञ समजणाऱ्या नागरिकांनी याबाबत सजगता दाखवणं गरजेचं आहे.