नाशिकचा महापौर राज आज ठरवणार का?

पुण्यानंतर राज ठाकरे आज नाशिकचा दौरा करणार आहेत. नाशिक महानगरपालिकेतला सर्वात मोठा पक्ष मनसे सध्या राज्यातील पहिला मनसेचा महापौर देण्याच्या तयारीत गुंतला आहे. सत्तास्थापनेसाठी ६२ हा आकडा गाठावा लागणार आहे.

Updated: Feb 19, 2012, 10:25 AM IST

www.24taas.com, नाशिक

पुण्यानंतर राज ठाकरे आज नाशिकचा दौरा करणार आहेत. नाशिक महानगरपालिकेतला सर्वात मोठा पक्ष मनसे सध्या राज्यातील पहिला मनसेचा महापौर देण्याच्या तयारीत गुंतला आहे. सत्तास्थापनेसाठी ६२ हा आकडा गाठावा लागणार आहे.

मनसेचे ४०, भाजपचे १४ नगरसेवक आणि काही अपक्षांच्या मदतीने महापौरपद खेचून आणण्यासाठी मनसे प्रयत्नशील आहे. मनसेशी युती करायला हरकत नाही, असे संकेत भाजपच्या नेत्यांकडून मिळत आहेत. त्यासाठीच राज ठाकरे आज विजयी नगरसेवकांशी संवाद साधून रणनीती आखतील, अशी चर्चा आहे.

दुसरीकडे मनसेला सत्तेपासनं दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची मदत घेऊन पुणे पॅटर्न राबवता येऊ शकतो का याचीही चाचपणी शिवसेनेच्या गोटात सुरु आहे. स्थानिक पातळीवरच निर्णय घेतला जाईल, असे सर्वच पक्ष सांगत असले तरी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.