www.24taas.com, लुसाने
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं (आयओसी) कुस्तीला २०२०च्या ऑलिम्पिक खेळांमधून बाहेरचा रस्ता दाखवलाय. या निर्णयाशी संबंधित असणाऱ्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, आयओसी कार्यकारी बोर्डानं ‘मॉडर्न पेन्टाथलन’ या खेळाला कायम ठेवून त्याच्याऐवजी कुस्तीला ऑलिम्पिकमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये भारताला आजवर ज्या खेळानं तब्बल चार पदकं मिळवून दिली तोच खेळ आता ऑलिम्पिकमधून बाहेर निघालाय.
मंगळवारी आयओसी सदस्यांच्या बैठकीत सध्याच्या ऑलिम्पिक कार्यक्रमात समाविष्ट असलेल्या २६ क्रीडा प्रकारांवर चर्चा झाली. त्यात कुस्तीसह सात खेळांचं नाव शॉर्टलिस्ट केलं गेलंय. यामधून एका खेळालाच २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवता येईल आणि याबाबतचा निर्णय सप्टेंबरमध्ये होईल. फ्रीस्टाईल आणि ग्रेकोरोमन अशा दोन प्रकारच्या कुस्ती स्पर्धेत ३४४ खेळाडू भाग घेतात. लंडन ऑलिम्पिकमध्ये या प्रकारासाठी अनुक्रमे ११ व ७ पदके ठेवण्यात आली होती.
१९५२च्या हेलंसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर २००८ मध्ये सुशील कुमारनं कांस्य आणि २०१२ मध्ये सुशील व योगेश्वदर दत्त यांनी अनुक्रमे रजत व कांस्यपदक भारताला मिळवून दिलंय.