सानिया म्हणतेय, आमचं वैवाहिक जीवन सोपं नाही

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिनं आपलं वैवाहिक जीवन धोक्यात असल्याच्या बातम्यांना अफवा असल्याचं सांगत उडवून लावलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 10, 2014, 01:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कराची
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिनं आपलं वैवाहिक जीवन धोक्यात असल्याच्या बातम्यांना अफवा असल्याचं सांगत उडवून लावलंय. आपला पती - पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि आपल्यात असलेल्या मतभेदांची जोरदार चर्चा मीडियात सुरू आहे. परंतु, असं काहीही नाही असं सांगत तिनं आपल्या फॅन्सला दिलासा दिलाय.
वैयक्तिक कामांसाठी सानिया सध्या आपल्या सासरी म्हणजेच सियालकोटला पोहचलीय. ती म्हणते, `आमचं वैवाहिक जीवन सोपं नाही कारण आम्ही दोघेही दोन वेगवेगळ्या देशांचे खेळाडू आहोत. आम्हाला याची जाणीव आहे की वेळेनुसार आमच्यावर दबाव वाढत राहील परंतु, आमच्या नात्याला आम्ही आत्तापर्यंत चांगलं निभावलंय. आमच्या दोघांत कोणत्याही प्रकारचा तणाव किंवा समस्या नाहीत`.
यूरोप टूर्नामेंटमध्ये सहभागी होण्याअगोदर पतीसोबत आणि कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी सानिया सध्या सियालकोटमध्ये आलीय. इथं तिनं खूप आनंदात वेळ घालवलाय. आपण खाण्या-पिण्यासाठी बाहेर गेलो आणि मनाला येईपर्यंत शॉपिंग केलं, असं सांगत सानियानं आपले फोटोही तिच्या चाहत्यांशी शेअर केलेत.
सानिया आणि शोएब बऱ्याच दिवसांपासून एकमेकांपासून लांब होते. परंतु, यामागे आमच्या कामांची कारणं होती असा खुलासा सानियानं केलाय. `एकमेकांपासून वेगळं राहणं आमच्या दोघांसाठीही सोपं नव्हतं. मी आत्ताही शोएबवर तितकंच प्रेम करते जेवढं चार वर्षांपूर्वी लग्नाच्या वेळी करत होते`.
यावेळी, तिनं आपल्याला पाकिस्तानात येणं आवडत असल्याचं म्हटलंय. पाकमध्ये जर एखादी आंतरराष्ट्रीय टूर्नामेंट झाली तर त्यात सहभागी होणं आवडेल, असंही तिनं म्हटलंय.
पुढच्या टेनिस सत्राआधी फ्रेश होण्याचा पाकिस्तानात येणं हा सर्वात चांगला उपाय होता. आयसीसी वर्ल्डकप टी २० चं फायनल सानियानं पाकिस्तानात बसून पाहिलं. टीम इंडियानं हा सामना गमावल्याचं दु:ख झालं... पण, तो दिवस श्रीलंकेचा होता. यासोबतच शोएब पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी आपण प्रार्थना करत असल्याचंही तिनं म्हटलंय. सानिया येत्या १८ एप्रिल रोजी यूरोपसाठी रवाना होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.