टेनिसफॅन्सच्या मुखी एकच नाव... ली ना ओेss ली ना!

चीनच्या ली ना हिने ऑस्ट्रेलिया ओपनच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. चौथ्या सीडेड ली नाने फायनलमध्ये स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका सिबुलकोव्हाला ७-६, ६-० नं पराभूत करत आपल्या करियरमध्ये प्रथमच ऑस्ट्रेलिया ओपनच्या विजेतेपदावर नाव कोरलं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 25, 2014, 07:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मेलबर्न
चीनच्या ली ना हिने ऑस्ट्रेलिया ओपनच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. चौथ्या सीडेड ली नाने फायनलमध्ये स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका सिबुलकोव्हाला ७-६, ६-० नं पराभूत करत आपल्या करियरमध्ये प्रथमच ऑस्ट्रेलिया ओपनच्या विजेतेपदावर नाव कोरलं. `ऑस्ट्रेलिया ओपन`चं विजेतेपद पटकावणारी ती पहिली एशियन महिला टेनिस प्लेअर ठरली आहे.
विलियम्स भगिनी, मारिया शारापोव्हा, गतविजेती व्हिक्टोरिया अझारेंका, अग्निएझ्का राडावान्स्का यांच्या पराभवानंतर यावेळीची ऑस्ट्रेलिया ओपनची नवी क्वीन कोण ठरणार याकडेच टेनिसरसिकांच लक्ष लागून राहिल होतं. अखेर चीनच्या लि ना हिने फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया ओपनच्या विजेतेपदावर नाव कोरत इतिहास रचला.
चौथ्या सीडेड लि नाने स्लोव्हाकियाच्या वीसाव्या सीडेड डॉमिनिका सिबुलकोव्हाचा ७-६, ६-० असा सरळ सेटमध्ये पराभव करत आपल्या करियरमधील दुसर ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावलं. यापूर्वी २०११ मध्ये लि नाने फ्रेंच ओपनच विजेतेपद मिळवल होतं. लि नाच्या करियरमधील हे पहिल ऑस्ट्रेलिया ओपनचं विजतेपद ठरलं असून अशी ऐतिहासिक कामगिरी करणारी ती पहिली महिला टेनिस प्लेअर ठरली आहे.
यापूर्वी २०११ आणि २१३ मध्ये ली ना हिनं ऑस्ट्रेलिया ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र दोन्हीही वेळा तिला उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं होतं. मात्र, यावेळी ली नाने जबरदस्त कामगिरी करत विजेतपद खेचून आणलं.
दरम्यान, पहिल्या सेटमध्ये ली नाकडून काही चूका झाल्या. यामुळेच टाय ब्रेकमध्ये गेलेल्या पहिल्या सेटमध्ये ५-१ नं आघाडीवर असतानाही सेट जिंकण्यासाठी ली नाला संघर्ष करावा लागला. अखेर ७-६ असा निसटता विजय तिने पहिल्या सेटमध्ये मिळवला. निराशाजनक कामगिरीनंतर मात्र ली ना सावरली आणि मग तिने धमाकेदार कामगिरी करत सिबुलकोव्हाला डोक वर काढण्याची संधीच दिली नाही. ली नानं दुसरा सेट ६-० ने असा सहज जिंकत ऐतिहासिक विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं आणि  ली ना ऑस्ट्रेलिया ओपनची नवी क्वीन ठरली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.