www.24taas.com, मेलबर्न
भारतीय हॉकी संघावर सुमार कामगिरीमुळे सातत्याने टीका होत होती. या टीकेला चोख प्रत्त्युत हॉकी टीमने दिलेय. चॅम्पियन्स हॉकीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत भारताने बेल्जियमचा १-० असा पराभव केला.
भारतासाठी १५०वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या सरदार सिंगने दिलेल्या पासवर संधी साधत नितीन थिमय्याने भारताचे खाते उघडले. बेल्जियमने बरोबरी साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. उत्तरार्धात बेल्जियमला काही पेनल्टी कॉर्नरही मिळाले. पण त्यांना त्यावर गोल करता आला नाही.
बेल्जियमच्या तोडीस तोड खेळ करणाऱ्या भारतानेही जोरदार आक्रमण केले. पण भारतालाही गोल करता आला नाही. बेल्जियमची आक्रमणे निष्फळ ठरवत भारताने मिळालेली आघाडी कायम राखत उपांत्य फेरी गाठली.
आता भारताची लढत ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या सामन्यातील विजेत्याशी शनिवारी होईल. १९८२नंतर भारताने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत पदक मिळविलेले नाही. तसेच, २००४ नंतर प्रथमच भारताने या स्पर्धेत टॉप चार संघांत प्रवेश केला आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या लंडन ऑलिंपिक स्पर्धेत भारताला शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.