www.24taas.com, नवी दिल्ली
धावपटू कविता राऊत हिला अर्जून पुरस्कारानं गौरवण्यात येणारय. आदिवासी भागातून आलेल्या कवितानं खडतर मेहनतीद्वारे अतिशय चांगली कामगिरी केलीय. तिच्यासोबत एथलेटिक्स सुधा सिंग, कुस्तीगीर नरसिंग यादव, स्नूकरपटू आदित्य मेहता हे महाराष्ट्राचे चार खेळाडूदेखील या पुरस्काराचे मानकरी ठरलेत. रविवारी, राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची केंद्रीय क्रीडा खात्याने अधिकृत घोषणा केलीय.
राजवर्धन राठोड अध्यक्ष असलेल्या समितीने दोघांची खेलरत्न आणि २५ क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली होती व ती केंद्रीय क्रीडा खात्याने मान्य केलीय. कविता राऊत लंडन ऑलिम्पिकसाठी पात्रता फेरीत ती अयशस्वी ठरली होती. पण तिच्या एकंदरीत कामगिरीची दखल भारत सरकारनं घेतलीय. नाशिक जिल्ह्यात त्रिंबक तालुक्यातल्या एका छोट्या गावात राहणाऱ्या या मुलीनं चमकदार कामगिरी केली आहे.
भारताचा शुटर विजय कुमारला आणि योगेश्वर दत्तला खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. तर युवीलाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी प्रामुख्याने एकाच क्रीडापटूची निवड होते तर अर्जुन पुरस्कारही पंधराच क्रीडापटूंना दिला जातो. पण अपवादात्मक परिस्थितीत बदल करता येतो. ऑलिंपिक पदक जिंकल्यामुळे हा बदल करण्यात आले आहेत, असं क्रिडा खात्यानं म्हटलंय. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारात सन्मानचिन्ह, गौरवपत्रकासह साडेसात लाख रुपयांचा समावेश आहे. तर अर्जुन पुरस्कारात सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि पाच लाख रुपयांचे बक्षीस दिलं जातं. हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या खेळाडूंना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
पुरस्काराचे मानकरी:
खेलरत्न पुरस्कार -
नेमबाज -विजय कुमार
कुस्ती - योगेश्वर दत्त
अर्जुन पुरस्कार -
तिरंदाज - दीपिका कुमारी, लैशराम बॉम्बयला देवी.
ऍथलेटिक्सर - सुधा सिंग, कविता राऊत
बॅडमिंटन - अश्विीनी पोनप्पा, पारुपल्ली कश्यंप,
बिलियर्डस् - स्नूकर - आदित्य मेहता.
मुष्टियुद्ध - विकास कृष्णन.
क्रिकेट - युवराज सिंग.
हॉकी - सरदारा सिंग
ज्यूडो - यशपाल सोळंकी
कबड्डी - अनुप कुमार
पोलो - समीर सुहाग.
नेमबाजी - अन्नुराज सिंग, ओंकार सिंग, जॉयदीप कर्माकर
स्क्वाश - दीपिका पाल्लीकल
जलतरण - संदीप सेजवल
वेटलिफ्टिंग - सोनिया चानू
कुस्ती - नरसिंग यादव, राजिंदर कुमार, गीता फोगत
वुशू - बिमलजित सिंग.
ऍथलेटिक्सं (पॅराऑलिंपिक्सक) - दीपा मलिक, रामकरण सिंग.