टागोर तुच्छ दर्जाचे नाटककार - कर्नाड

‘रवींद्रनाथ टागोर हे एक महान कवी होते परंतू ते तुच्छ दर्जाचे नाटककार होते. त्यांच्या समकालीन बंगाली थिएटर्सनं त्यांच्या नाटकांना कधीच स्वीकारलं नाही’असंही कर्नाड यांनी म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 10, 2012, 09:08 AM IST

www.24taas.com, बंगळुरू
व्ही एस नायपाल यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करून याआधीच वादात अडकलेले लेखक आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांनी आता आणखी एक वादग्रस्त विधान केलंय. यावेळी त्यांचं टार्गेट होतं, नोबल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर.
‘रवींद्रनाथ टागोर हे तुच्छ दर्जाचे नाटककार होते’असं वक्तव्य कर्नाड यांनी केलंय. बंगळुरूजवळच्या नेलमंगलममध्ये ते बोलत होते. ‘रवींद्रनाथ टागोर हे एक महान कवी होते परंतू ते तुच्छ दर्जाचे नाटककार होते. त्यांच्या समकालीन बंगाली थिएटर्सनं त्यांच्या नाटकांना कधीच स्वीकारलं नाही’असंही कर्नाड यांनी म्हटलंय.
ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरविल्या गेलेल्या कर्नाड यांच्या मते, गेल्या ५० वर्षांत बादल सरकार, मोहन राकेश आणि विजय तेंडूलकरसारखे अनेक नाटककार झालेत जे टागोर यांच्यापेक्षा कित्येक पटीनं चांगले होते.
मागच्याच महिन्यात कर्नाड यांनी व्ही एस नायपाल यांच्यावर टीका केली होती. भारतीय मुसलमानांबद्दल असलेल्या नायपाल यांच्या मतावरून कर्नाड यांनी ही टीका केली होती.
‘टागोर यांना निर्धन वर्गाचं ज्ञान नव्हतं कारण ते एका उच्च कुलीन घरातून आलेले होते’असं ययाति, तुघलक, नागामंडळ यांसारख्या अनेक कलाकृती सादर करणाऱ्या कर्नाड यांनी म्हटलंय.