नाटक सुरू असतानाच गणेश खाली कोसळला…

आपल्या विविधांगी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात भरलेल्या गणेश जेधे हे रंगकर्मी ‘आम्ही लग्नाशिवाय’ या नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच स्टेजवर खाली कोसळले. त्यांना हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आल्यानंतर त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचं स्पष्ट झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 10, 2013, 01:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपल्या विविधांगी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात भरलेल्या गणेश जेधे हा रंगकर्मी ‘आम्ही लग्नाशिवाय’ या नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच स्टेजवर खाली कोसळला. त्याला हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आल्यानंतर ब्रेन हॅमरेज झाल्याचं स्पष्ट झालंय. गणेशवर उपचारासाठी जवळजवळ सहा लाखांचा खर्च अपेक्षित आहे त्यामुळे या कलावंताला मदतीची गरज आहे.
संतोष मयेकर हे मुख्य भूमिकेत असलेल्या ‘आम्ही लग्नाशिवाय’ या नाटकात गणेश सहकलाकाराची भूमिका साकारत आहे. १ जुलै रोजी या नाटकाचा पहिलाच प्रयोग वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात सुरू होता. नाटक संपत संपत आलं आणि संवादफेक सुरू असतानाच गणेशला दरदरून घाम सुटला आणि तो स्टेजवर कोसळला. त्याला तातडीनं परळच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथं त्याला ब्रेन हॅमरेज झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि सगळ्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. अतिरक्तदाबाचा त्रास असल्यामुळेच त्याला ब्रेन हॅमरेज झाला, असे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती जेधे यांची पत्नी कविता जेधे यांनी दिलीय.
गणेशच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यानं डॉक्टरांना तातडीनं त्याच्यावर शस्त्रक्रिया करणं भाग पडलं. गणेशची प्रकृती अजूनही गंभीर आहे, तो कोमात आहे. आत्तापर्यंत त्याच्यावर उपचारासाठी चार लाख खर्च झालाय अजून किमान सहा लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्या मराठी कलाकाराला मदतीची गरज आहे.

आठवी इयत्तेत असतानाच गणेशनं पहिल्यांदा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं ते ‘तोची एक समर्थ’ या चित्रपटातून... अभिनेत्री अलका कुबल यांच्या मुलाची भूमिका त्यानं यात साकारली होती. शरियत, आयडियाची कल्पना आणि खोखो या चित्रपटांतूनही तो प्रेक्षकांसमोर आला. तर पहिल्या बापाचा पहिला मुलगा, यदा यदाही अधर्मस्य, यदा कदाचित या नाटकातील त्याच्या भूमिकांनी त्यानं प्रेक्षकांना आपलंसं केलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.