www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
अभिनेता प्रशांत दामले लवकरच एक नवीन नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतायेत ‘नकळत दिसले सारे…’ दृष्टीहिनांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकणारं हे नाटक आहे. विशेष म्हणजे शुभारंभाच्या प्रयोगाच्या दिवशी स्वतः प्रशांत दामले एक नवा संकल्प करणार आहेत.
नेत्रदानाचं महत्व सांगणारं आणि त्याबाबत एक नवी अन् तितकीच डोळस दृष्टी दाखवणारं नवीन नाटक प्रशांत दामले लवकरच रंगभूमीवर आणतायेत. या नाटकाचा मुहूर्त काहीशा वेगळ्या पद्धतीनं करण्यात आला. जन्मताच आलेल्या अंधत्वावर मात करून मोठ्या हिमतीनं स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द दाखविणाऱ्या नुपूर जोशीच्या हस्ते नाटकाचा मुहूर्त करण्यात आला. अंधत्वावर मात करून यशाची नवी शिखरे दाखविणारी काही मान्यवर मंडळीही यावेळी आवर्जून हजर होती. अचानक आलेल्या अंधत्वामुळं सैरभैर झालेल्या नायकाची भूमिका प्रशांत दामले साकारताहेत. विशेष म्हणजे आजच्या धावपळीच्या युगात नेत्रदानाचं महत्व पटवून देण्यासाठी स्वतः प्रशांत दामलेंनीही नेत्रदान करण्याचा संकल्प केलाय.
झी मीडियानंही नेत्रदान जनजागृती अभियान सुरू केलंय. नेत्रदानाचं महत्व इतरांना सांगण्यासाठी जनजागृतीची खरी गरज असल्याचं मत झी 24तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी यावेळी व्यक्त केलं.
एकूणच नकळत दिसले सारेच्या निमित्तानं एक अभिनेता म्हणून नेत्रदानाविषयी प्रशांत दामलेंनी घेतलेला हा पुढाकार इतरांनाही नवी दृष्टी देणारा ठरेल, अशी अपेक्षा करुयात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.