www.24taas.com, मनमाड
मनमाडमध्ये आज पाण्यासाठी कडकडीत बंद पाळण्यात येतोय. मनमाडकरांनी पाण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारलंय. नागरिकांच्या या बंदला सर्वपक्षीय नेत्यांनीही पाठींबा दिलाय.
पालखेड डाव्या कालव्यातून पाण्याचं आवर्तन त्वरित सोडावं, पुढील आवर्तनाचा कालावधी दोन महिन्यांवरून दीड महिन्यांवर आणावा आणि मनमाडकरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी करण्यात आलीये. सकाळपासून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. शहरातील मुख्य बाजारपेठेसह दुकानंही बंद आहेत. बंदचा शाळा महाविद्यालयांच्या उपस्थितीवरही परिणाम झालाय. वागदरडी धरणावर नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय.
मनमाडला पाणी पुरवठा करणारं वागदरडी धरण यंदा केवळ ५ टक्केच भरलंय. त्यामुळे २० ते २२ दिवसांनी पाणीपुरवठा केला जायचा मात्र आता तोही बंद झाल्यानं नागरिकांसमोर पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झालाय. टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, मात्र तो फारच अपुरा ठरत असल्यानं नागरिकांच्या संतापत भर पडलीये.