www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
कधी एकदा पाऊस येतो, आणि भरपूर पाणी मिळतं, असं दुष्काळग्रस्तांना झालंय. निसर्गानं कृपा दाखवली, तरी आपल्या प्रशासकीय उदासीनतेमुळे ग्रामीण भागातल्या जनतेपासून पिण्याचं पाणी कोसो दूर राहील, अशीच चिन्हं आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या जवळपास दीडशे पाणी पुरवठा योजना गेल्या वर्षभरापासून बंद आहेत.
नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण, सिन्नर, दिंडोरी या तालुक्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणा-या प्रशासनाच्या अनास्थेमुळे गेल्या वर्षभरापासून १५२ स्वतंत्र पाणी पुरवठ्याच्या योजना बंद आहेत. यात पालकमंत्र्यांच्या येवला तालुक्यातल्या सर्वाधिक २० योजना बंद आहेत. त्या खालोखाल सुरगाणा १९ आणि १७ योजनांसह इगतपुरीचा क्रमांक लागतो. तर ३१६ योजना अपूर्ण आहेत. १५२ पैकी ११ पाणी पुरवठा योजनांचं वीज कनेक्शन वीज वितरण कंपनीनं तोडलंय. तर १४ योजनांत अपहर आणि १३ योजना अंतर्गत वादामुळे बंद आहेत. काही योजनांचा मार्गच चुकीचा आहे. उताराकडून पाणी उंच भागात नेण्याची किमया पाणीपुरवठा विभागानं केलीय. त्यामुळे टाकलेली पाईपलाईन पुन्हा बदलण्याची वेळ प्रशासनावर आल्यानं कोट्यवधी रूपयांचं नुकसान तर होतंच आहे. शिवाय पाण्याची बोंबही कायम आहे. याप्रकरणी प्रशासनाला गाठलं असता, लवकरच समस्या सोडवू, असं कोरडं आश्वासन अधिकारी देत आहेत.
पाऊस आला तर पाणीप्रश्न मिटेल, या आशेवरच ग्रामीण भागातली ही जनता पावसाकडे डोळे लावून बसलीय. पण पाणीयोजनांच्या या घोळामुळे पाऊस आला तरी त्यांच्या गावात पाणी इतक्यात तरी पोहोचणं शक्य नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.