www.24taas.com, मुकुल कुलकर्णी, नाशिक
आई म्हणजे संस्काराची शिदोरी, असं म्हटलं जातं..मात्र नाशिकमध्ये एक आईच तिच्या मुलाला चोरीचे धडे देतेय. अखेर मायलेकांची ही जोडी एका सीसीटीव्हीत कैद झाली आणि चोरी उघड झाली. मायलेकांची ही जोडी जरा अजब आहे. त्यांच्या चेह-यांवरच्या भोळेपणावर जाल, तर फसगत झालीच म्हणून समजा...सीमा घुले आणि शुभम घुले अशी मायलेकांची नावं. सीसीटीव्ही कॅमे-यात जोडीच्या करामती कैद झाल्यात.
मोठमोठ्या शोरूमध्ये जायचं आणि तिथे टीव्ही, लॅपटॉप, आयफोन, मोबाईल अशा महागड्या वस्तू चलाखीनं लंपास करायच्या. सेल्समनला गोंधळून टाकायचं आणि हातसफाई करायची, असा यांचा फंडा. अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पाळत ठेऊन या मायलेकाच्या जोडीला दुकानमालकांनीच पोलिसांच्या ताब्यात दिलं. या जोडीच्या पंचवटीतील घरावर पोलिसांनी छापा टाकला असता पोलिसांना चोरीच्या अनेक महागड्या वस्तू आढळून आल्या.
खरंतर शुभम घुले हा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी. मात्र चैनीच्या वस्तुंची हौस भागवण्यासाठी आईसोबतच त्याने चोरीचा मार्ग पत्करला. तर मुलाला संस्कारांची शिदोरी देणारी जननी म्हणून आईकडे पाहिलं जातं. श्यामची आई हे यातलं आदर्श उदाहरण नेहमीच दिलं जातं. मात्र, कुठे श्यामची आई आणि कुठे स्वतःच्या मुलालाच चोरीचे धडे गिरवायला भाग पाडणारी ही आजची आई.