www.24taas.com, झी मीडिया, धुळे
लग्नानंतर तीनच दिवसात पुत्ररत्न झाल्याची घटना धुळ्यात घडल्याने गावात चांगलीच चर्चा सुरू झालीय. धुळे तालुक्यातील न्याहळोद येथे २ मे रोजी लग्न झालेल्या नववधूने ४ मे रोजी रात्री मुलास जन्म दिल्याने एकच खळबळ उडाली.
न्याहळोद गावच्या एका तरूणाचे २ मे रोजी पिंपळगाव येथील एका तरूणीशी मोठय़ा थाटात लग्न झाले. लग्नाचे दोन दिवस मजेत गेले. त्यानंतर देवदर्शन घेण्याची परंपरा असल्याने नवविवाहीता आणि नवरदेव संस्कृती आणि परंपरेनुसार ४ मे रोजी कुलदेवतेच्या दर्शनासाठी जाण्याची तयारी सुरु केली. यासाठी वाहनही ठरविण्यात आले होते. मात्र रात्री नववधूला अचानक त्रास होऊ लागला. कोणाला काहीही समजेना. एकच धावपळ उडाली.
नववाहितेला डॉक्टरांकडे नेण्याचे ठरलं. मात्र, परिस्थिती नाजूक असल्याने डॉक्टरांना घरी बोलविण्यात आले. स्थानिक डॉक्टर येईपर्यंत या नवविवाहितेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर दोघांनाही पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारानंतर चर्चा सुरू झाली. वराकडील मंडळी संतापली. काय करायचे तेच समजेना. याबाबत वराकडील सर्व मंडळ अनभिज्ञ होती. या घटनेने निर्माण झालेला पेच कसा सोडवायचा हा मोठा प्रश्न होता.
झालेला सर्व प्रकार गावकऱ्यांना सांगण्यात आला. त्यानंतर सर्व प्रकार तंटामुक्त समितीकडे आला. कोणत्याही भांडणतंट्याशिवाय सामोपचाराने सोडविण्यात तंटामुक्ती समिती आणि गावातील ज्येष्ठ मंडळीला यश आले आहे. वधू-वर पक्षाची मंडळी एकत्र येऊन वाद न घालता सामोपचाराने समाजाच्या मदतीने हा प्रश्न सोडवण्यात आला.
तंटामुक्त अध्यक्ष आणि काही सदस्य यानी यात सहभाग घेतला. आवश्यक कागदपत्रे तयार करुन वर आणि वधू पक्ष स्वतंत्र झाले असल्याची माहिती समाज प्रमुखांनी दिली. त्यामुळे त्यांचे तिन दिवसांचे लग्न ठरल्याची चर्चा आहे.