८० रूपयांत भिंत? मात्र, अधिकाऱ्यांनी ते शक्य केलंय!

सरकारी अधिकारी किती निगरगट्ट असू शकतात, याचा जिवंत अनुभव वर्ध्यातील एका शेतक-याला आलाय... मुसळधार पावसामुळं या शेतक-याच्या घराची भिंतच वाहून गेली. सरकारकडून त्यासाठी नुकसान भरपाईही मिळाली... किती? ८० रूपये फक्त...

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 23, 2013, 03:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वर्धा
सरकारी अधिकारी किती निगरगट्ट असू शकतात, याचा जिवंत अनुभव वर्ध्यातील एका शेतक-याला आलाय... मुसळधार पावसामुळं या शेतक-याच्या घराची भिंतच वाहून गेली. सरकारकडून त्यासाठी नुकसान भरपाईही मिळाली... किती? ८० रूपये फक्त.
५०वर्षांचे सोनाबा बावणे हे सेलू तालुक्यातील जुवाडी गावात राहतात. वर्धा जिल्ह्यात यंदा पावसानं धुमाकूळ घातला.. त्यात बावणेंच्या घराची भिंत पडली. सरकारी अधिका-यांनी पंचनामा केला आणि सेलूच्या तहसीलदारांच्या स्वाक्षरीने नुकसान भरपाईचा चेकही पदरात पडला... हा चेक मिळाल्यावर बावणेंनी कप्पाळावर हातच मारून घेतला. कारण पडलेल्या भिंतीपोटी केवळ १ टक्के नुकसान झाल्याचं दाखवण्यात आलं. ही पडलेली भिंत दुरुस्त करण्यासाठी जवळजवळ १५ हजार रुपये खर्च आला.
मात्र मायबाप सरकारनं काय निकष लावला, त्यांचं त्यांनाच माहित.. पण चक्क ८३ रुपयांचं नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला. त्यातही ३ रूपयांचा कट लावून, ८० रुपयांचा धनादेश बावणेंच्या हातात पडला. शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे. परंतु गेंड्याच्या कातडीचे सरकारी अधिकारी एवढे निर्ढावलेत की, नियमांवर बोट ठेवून आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न आता ते करत आहेत.
१४ ऑगस्ट २०१३ च्या निर्णयानुसार अंशतः १ टक्का नुकसान झाल्याने ८३ रुपयांचा मोबदला होतो. त्यानुसार हे पैसे देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता तसेच ग्रामसेवक, तलाठी यांनी मिळून हे सर्वेक्षण केलं होतं. बावणे यांच्या घराच्या कौलांची जरी किंमत काढली तरी ८० रुपयांपेक्षा जास्त होईल.
बळीराजाचे पाठीराखे असल्याचा आव सरकारचे मंत्री आणत असतात... मात्र बावणे यांना मिळालेला ८०रूपयांचा मदतीचा धनादेश म्हणजे शेतक-यांची क्रूर थट्टाच आहे. अशा निगरगट्ट सरकारी अधिका-यांचं डोकं त्याच भिंतीवर आपटण्याची गरज आहे. अशा असंवेदनशील अधिका-यांच्या हातात बेड्या घालून त्यांना फोडून काढलं पाहिजे, अशी भावना लोकांकडून व्यक्त होत आहेत. बावणेंच्या वाट्याला आलेले हे भोग अन्य कुणाच्याही नशिबी येऊ नयेत, अशीच आता चर्चा आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हि़डिओ