बुलडाणा : शेतकरी आत्महत्या हा अत्यंत काळजीचा विषय झाला असताना बुलडाण्यातल्या एका गावानं राज्याला आगळा आदर्श घालून दिलाय.
दुष्काळ, नापिकी किंवा आर्थिक संकटामुळे कधीच खचून जाणार नाही. आत्महत्या करणे हा कुटुंबाला आणि गावाला कलंक असून, तो आम्ही कधीही गावाला लागू देणार नाही, याची ग्वाही देतो. अशी शपथ गावकऱ्यांनी घेतली.
बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील परडाच्या ग्रामस्थांनी घेतलेली ही शपथ. नवनिर्वाचित सरपंच छायाताई पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतीनं एक ठराव केला. त्यानुसार गावातल्या प्रत्येकाला ही शपथ देण्यात आली. आत्महत्या करणार नाहीच, पण कोणाला करूही देणार नाही अशी शपथ गावकऱ्यांनी घेतली.
आमच्या गावातील शेतकरी, शेतमजूर व इतर कोणीही आर्थिक संकटास सापडल्यास आम्ही सर्व मिळून त्यास मदतीचा हात देऊ आणि स्वाभिमानाने जीवन जगण्याचा प्रयत्न करू. आत्महत्या करणे हे स्मस्येचे उत्तर नसून, अनेक समस्यांची सुरुवात आहे...
गावानं उचललेलं हे पाऊल अतिशय महत्वाचं आहे. तालुक्यातल्या सर्व 66 ग्रामपंचायतींमध्ये अशीच शपथ देण्याचा निर्धार आता प्रशासनानं केलाय.