मोदींसाठी ‘आरएसएस’ आलं धावून...

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदाच भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला केल्यानंतर आता ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ मोदींच्या मदतीला धावून आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 5, 2014, 12:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदाच भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला केल्यानंतर आता ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ मोदींच्या मदतीला धावून आलाय.
‘नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देशाचा नाही तर काँग्रेसचा विनाश होणार असल्यामुळेच पंतप्रधान असे आरोप करत असल्या’ची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी केलीय. गुजरात दंगलीसंदर्भात कोर्टानं क्लीन चीट दिल्यानंतरही अशा प्रकारचे आरोप मनमोहन सिंग करत असतील तर काँग्रेसनं त्याविरोधात हायकोर्टात जावं, असंही मा.गो. वैद्यांनी म्हटलंय.
दरम्यान, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या टीकेनंतर मोदी आज रायगडमध्ये पहिल्यांदाच जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी उत्तर देण्याची शक्यता आहे. रायगडमधला कार्यक्रम आटोपल्यानंतर मोदी योगगुरु बाबा रामदेव यांच्या व्यासपीठावर दिसणार आहेत. बाबा रामदेव यांनी तालकटोरा स्टेडियमवर आपल्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलंय. लोकसभा निवडणुकांसाठी मोदींना सशर्त पाठिंबा देणार असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं. परदेशातून काळा पैसा परत आणण्याचं आश्वासन दिल्यास पाठिंबा देणार असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.