www.24taas.com, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा शहरातून महिला आणि मुली विकण्याऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. वरोऱ्यातल्या एका महिलेमुळे पोलिसांना या रॅकेटचा पर्दाफाश करता आला.
या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलीय. तर दोन जण फरार आहेत. वरोरा शहरातली पंचफुला नक्षिणे ही महिला युपीतल्या मथुरेत या महिलांना विकायची. घरगुती वादानं त्रस्त महिला आणि मुलींना लक्ष्य करून पंचफुला त्यांना उत्तर प्रदेशात न्यायची आणि ५० ते ५५ हजारांत एका जोडप्याला विकायची. वरोऱ्यातल्या एका महिलेलाही तिनं असंच मथुरेत एका जोडप्याला विकलं. त्या महिलेला या जोडप्याचा संशय आला. त्यावनंतर तिनं या जोडप्याला पोलिसांची धमकी दिली. पतीकडून दिल्या जाणाऱ्या जाचाबद्दल या महिलेनं अनेकदा पंचफुलाकडे वाच्यता केली होती. हिच संधी पंचफुलानं साधली आणि या महिलेला आपल्या जाळ्यात ओढलं, अशी माहिती वरोरो पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष महेकर यांनी दिलीय.
पण या महिलेल्या प्रसंगावधानामुळे ती बचावली. शिवाय तिच्या पतीनंही ती बेपत्ता असल्याची तक्रार वरोरा पोलिसांत केली होती. त्यातूनच पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला. अटक केलेल्यांमध्ये सुनिता ठाकूर, तिचे वडील उद्धव बुरडकर आणि वरोऱ्यातली दलाल महिला पंचफुला नक्षीणे यांना पोलिसांनी अटक केलीय.