www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसानं कालपासून दमदार हजेरी लावलीय. नागपुरात रात्रभरात 72 मिमी पावसाची नोंद झालीय. भंडारा जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून संततधार सुरू आहे. जिल्ह्यातून वाहणा-या वैनगंगा नदीचा स्तर वाढल्यामुळं गोसीखुर्द धरणाचे 12 दरवाजे अर्धा मीटरपर्यंत उघडण्यात आलेत.
साकोली-लाखांदूर रस्त्यावर पाणी साचल्यानं हा रस्ता बंद करण्यात आलाय. तर लाखांदूर तालुक्यातल्या ओपरा गावाला पाण्यानं वेढलं असल्यामुळं गावाचा संपर्क तुटलाय. गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातल्या हेमलकसाजवळ पर्लकोटा नदीचं पाणी पुलावरून 5 फूट उंचीवरून वाहत असल्यानं भामरागड तालुका मुख्यालयासहित 60 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय. भामरागड-कसनसूर रस्तादेखील पावसामुळे बंद पडलाय. चंद्रपुरात दोन दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार आजही सुरूय. त्यामुळं जिल्ह्यातल्या जनजीवन विस्कळीत झालंय.
गेल्या 24 तासांत चंद्रपूर जिल्ह्यात 61.23 मिमी पाऊस झाला असून गोंडपिंपरी तालुक्यात सर्वाधिक 96.6 मिमी पावसाची नोंद झालीय. मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातल्या वर्धा, इरई आणि झरपट नद्या दुथडी भरून वाहतायत. तर पावसामुळं पाण्याचा निचरा होत नसल्यानं चंद्रपूर शहरातल्या काही भागातल्या घरांमध्ये पाणी घुसल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.