www.24taas.com, पुणे
ज्योतीकुमारी चौधरीच्या बलात्कार आणि खून प्रकरणातल्या दोन आरोपींची फाशीची शिक्षा हायकोर्टानं कायम ठेवली आहे. या प्रकरणात कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाडे यांना हायकोर्टानं दोषी ठरवलंय. बलात्कार आणि खून याप्रकरणी दोन्ही आरोपींना पुणे सत्र न्यायालयानं याआधीच दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात आरोपींनी हायकोर्टात दाद मागितली होती. आता महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारनं काही गाईडलाईन्स तयार कराव्यात यासाठी मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश मुख्य न्यायाधीशांकडे अर्ज करणार आहेत.
नोव्हेंबर 2007 ला मल्टी नॅशनल कंपनीत काम करणा-या ज्योतीकुमारी चौधरी या 25 वर्षीय तरूणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. हिंजवडीतल्या विप्रो कंपनीत ज्योती काम करत होती. नाईट शिफ्टला जाण्यासाठी निघालेली ज्योती रात्री दहाच्या सुमारास कॅबमध्ये बसली होती. मात्र, कॅब कंपनीकडे नेण्याऐवजी कॅबचा ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाडेनं ज्योतीकुमारीला जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर निर्जनस्थळी नेलं. आणि तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या केली.
हायकोर्टानंही आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवल्यामुळे नक्कीच अशा निर्ढावलेल्या आरोपींवर जरब बसेल असा विश्वास नागरिकांच्या मनात निर्माण होईल.