www.24taas.com , झी मीडिया, नागपूर
मुंबई आणि दिल्लीसह नागपूर सारख्या शहरात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढताहेत. पीडितांमध्ये शाळांमधल्या विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक आहे. मात्र या प्रकारांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक कौतुकास्पद युक्ती लढवलीय.
शाळांमधल्या विद्यार्थिनींवरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी एका हत्यार म्हणून नागपूर पोलिसांनी नवी युक्ती लढवलीय. शाळेतल्या विद्यार्थिनींना अनेक अत्याचारांना सामोरं जावं लागतं. मात्र बदनामीच्या भीतीनं पीडित विद्यार्थिनी त्याची कुठंही वाच्यता करत नाहीत. यामुळं त्यांच्यावरील अन्यायाचा वाचा तर फुटतच नाही पण अत्याचार करणारे नराधम मात्र मोकाट फिरतात. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नागपूर जिल्ह्यातल्या ४२६ शाळांमध्ये विशेष तक्रार पेट्या बसवल्या आहेत.
दर १५ दिवसांतून एकदा या पेट्या उघडल्या जातात आणि त्यातील तक्रारींवर कारवाई केली जाते. शाळा प्रमुख, पोलीस निरीक्षक आणि शिक्षण अधिकारी यांची समिती याबाबत निर्णय घेते.
हा उपक्रम केवळ त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात आणि विद्यार्थिनींपुरताच मर्यादित नाही. तर शाळेतला एखादा शिक्षक शिक्षिकेला त्रास देत असेल तर त्याचीही दखल या तक्रापेटीतून घेतली जाते.
एकूणच नागपूर पोलिसांच्या या उपक्रमाचा संपूर्ण शहरात कौतूक होतंय. त्यांच्या या उपक्रमामुळं महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच फायदा होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.