‘एटीएम’ भंगलं… महायुतीसमोर राज ठाकरेंचं आव्हान!

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंगचा फॉम्युर्ला गोपीनाथ मुंडेंनी यशस्वी करुन दाखवला. मुंडेंच्या अकाली निधनानं आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्रालयावर भगवा कसा फडकवायचा? असा प्रश्न फक्त भाजपलाच नव्हे, तर महायुतीला पडलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 6, 2014, 10:56 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंगचा फॉम्युर्ला गोपीनाथ मुंडेंनी यशस्वी करुन दाखवला. मुंडेंच्या अकाली निधनानं आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्रालयावर भगवा कसा फडकवायचा? असा प्रश्न फक्त भाजपलाच नव्हे, तर महायुतीला पडलाय.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या तसंच महायुतीच्या राजकारणावर परिणाम होणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीनं महाराष्ट्रात 42 जागा जिंकून चमत्कार घडवला. हाच चमत्कार विधानसभा निवडणुकीतही घडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. त्यामुळंच की काय जागा वाटपाच्या सूत्रावरून आणि मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत वाद सुरू झाले. अशा प्रसंगातून मार्ग काढण्याची क्षमता ज्या नेत्यामध्ये होती, ते म्हणजे गोपीनाथ मुंडे... ‘एटीएम’ म्हणजे आठवले ठाकरे मुंडे त्रिसूत्रीचे जनक... महायुतीचे शिल्पकार... मात्र त्यांच्या अपघाती निधनानं शिवसेनेच्या गोटातही चिंतेचं वातावरण आहे. तूर्तास कुठलीही टोकाची भूमिका घेण्याची सध्या तरी शिवसेना नेत्यांची इच्छा नाही.
शिवसेना भाजप युती ही कुणा एका व्यक्तिशी नाही तर विचारांशी आहे, जोपर्यंत विचार जुळतात तोपर्यंत युती राहाणारच, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केलीय. पण, मुंडेच्या निधनानंतर आता महाराष्ट्र भाजपचा चेहरा कोण, प्रदेश भाजपची धुरा कोण सांभाळणार, याकडंही महायुतीच्या नेत्याचं लक्ष असणार आहे. विशेषतः सेनेच्या पुढच्या राजकारणाची दिशा त्यानुसारच ठरणार आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानं महाराष्ट्रावर दुःखाची कुऱ्हाड कोसळलीय. केंद्रीय नेतृत्त्वाला आपलं मत पटवून देण्याची ताकद असलेला मोठा नेता काळानं हिरावून नेलाय. आता कालाय तस्मै नमः असं म्हणत शिवसेना भाजपच्या नेत्यांना नव्या काळाच्या सहमतीच्या राजकारणाची जुळवाजुळव करावी लागणार आहे. जास्तीत जास्त मुद्यांवर सहमती व्हावी, असं शिवसेना-भाजप नेत्यांना वाटतंय. त्यासाठी अहंकार, गैरसमज आणि सत्ता संघर्ष दूर ठेवत महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचं मुंडेचं स्वप्न साकारण्याची इच्छाशक्ती या दोन्ही पक्षाचे नेते दाखवणार का?

महाराष्ट्रात पुन्हा शिवशाहीची सत्ता आणायची असेल तर दोन्ही पक्षांना एकमेकांच्या साथीची गरज आहे. विशेषतः मुंडेंच्या निधनानंतर महायुती एकसंध ठेवण्याचं आव्हानही शिवसेना भाजप नेत्यांपुढे असणार आहे. दरम्यान, शिवसेना भाजपमध्ये कुठलाही सत्ता संघर्ष नाही, उलट समन्वय आहे, मुंडे असतानाही होता. मुंडेच्या निधनानंतर महायुती एकसंध राखण्याचं आव्हान आहे, पण एकत्र राहू आणि विधानसभा जिंकू, असा विश्वास भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय.
लोकसभा निवडणुकीतल्या पराभवामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार विधानसभेसाठी नवी व्यूहरचना आखतेय. अस्तित्वाचा प्रश्न असल्यानं आघाडी पूर्ण ताकद पणाला लावणार आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः विधानसभा निवडणूक लढण्याची आणि मुख्यमंत्री बनण्याची भूमिका व्यक्त केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाचा नूरच बदललाय. मुंडेसारखी तोफ मैदानात नसताना, या आव्हानांचा मुकाबला महायुती कशी करणार? आणि मंत्रालयावर भगवा फडकवण्याचं स्वप्न कसं साकारणार? याकडं सर्वांच्या नजरा लागल्यायत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.