www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी `सनातन`चा काहीही संबंध नसल्याचा खुलासा संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केलाय. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा खुलासा केला. शिवाय सनातन संस्थेनं कालच जाहीर पत्रक काढून डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येचा निषेधही व्यक्त केला होता.
सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत, सनातन संस्थेचा लढा हा वैचारिक लढा आहे. नरेंद्र दाभोलकरांशीही आमचे वैयक्तिक मतभेद नव्हते. त्यामुळं त्यांच्या हत्येनं आम्हालाही धक्काच बसलाय, अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
पुण्यात काल डॉ. नरेंद्र दाभोलकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर सर्वप्रथम सनातन संस्था आणि अन्य कट्टर हिंदुत्ववादी संघटनांकडेच संशयानं पाहिलं जातंय. काही कार्यकर्त्यांनी दाभोलकरांच्या हत्येसाठी सनातन संस्थेलाच जबाबदार ठरवलं. टीव्हीवरील चर्चेत सहभागी झालेल्या काही राजकीय नेत्यांनी तसंच विचारवंतानी याप्रकरणी सनातन संस्था ज्या पद्धतीने कट्टरतावादाला खतपाणी घालते, त्याला जबाबदार धरलं होतं. त्यापार्श्वभूमीवर आज सनातन संस्थेच्या पत्रकार परिषदेकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे कोण असेल, याबाबत वेगवेगळ्या शक्यता पोलिसांकडून पडताळून पाहिल्या जात आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला विरोध असणाऱ्यापैकीच कुणा व्यक्तीनं वा संघटनेनं हे टोकाचं पाऊल उचललंय काय, यादृष्टीनं ते तपास करत आहेत. त्यामुळं सनातन संस्थेवर संशयाची सुई रोखली गेली आहे. परंतु, अशाप्रकारच्या आरोपांमुळं आपल्या संस्थेची बदनामी होत असल्याचा तीव्र आक्षेप सनातन संस्थेनं घेतलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.