<B> चिमुरड्यांच्या डोळ्यासमोर फुटला सुतळी बॉम्ब! </b>

दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. पण, याच दिवाळीत फटाक्यांमुळे दोन चिमुकल्यांचं आयुष्य कायमचं अंधारमय केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 6, 2013, 04:48 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. पण, याच दिवाळीत फटाक्यांमुळे दोन चिमुकल्यांचं आयुष्य कायमचं अंधारमय केलंय.
यंदाच्या दिवाळीत फटाके फोडताना दोन चिमुरड्यांना आपले डोळे गमवावे लागलेत तर जवळजवळ ७० जणांना डोळ्यांना व शरीरावर इतर ठिकाणी जखमा झाल्याची माहिती मिळतेय. त्यातील १० जण गंभीर स्वरुपात जखमी झालेत.
मालाडमध्ये राहणाऱ्या सनी श्रीवास्तव या सात वर्षांच्या मुलाला फटाक्यांची जबर किंमत चुकवावी लागलीय. या चिमुरड्याच्या अगदी डोळ्याजवळच सुतळी बॉम्ब फुटल्यानं त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झालीय. त्याला तात्काळ केईएम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं इथं त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण, डॉक्टरांना मात्र या चिमुरड्याची दृष्टी वाचवण्यात अपयश आलं.
दुसरीकडे, जोगेश्वयरीचा पाच वर्षांचा साहिल राठोड याला फटाके फोडताना डोळ्याला दुखापत झाली. दोन खासगी रुग्णालयांमध्ये दिवाळीनिमित्त डॉक्टर रजेवर असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. सर जे. जे. रुग्णालयात नेईपर्यंत डोळ्याला इन्फेक्शन झाल्याने त्याची दृष्टी वाचवता आली नाही. १२ वर्षांच्या इरफान खान याला रविवारी सुतळी बॉम्ब फोडताना डोळ्याला इजा झाली होती. पण वेळीच उपचार मिळाल्याने त्याची दृष्टी वाचली, असे जे. जे. रुग्णालयाच्या नेत्रशल्यचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांनी सांगितले.

जोगेश्वडरीच्या श्यामनगरात गीता पाल या खरेदीसाठी रिक्षाने जात असताना फटाक्यामुळे उडालेल्या दगडाचा मार लागल्याने त्यांची दृष्टी अंधुक झाली. शोभेच्या चायनीज अनारचा स्फोट झाल्याने नऊ वर्षांचा रणजीत बिम याच्या उजव्या डोळ्याला गंभीर जखम झाली. दोघांनाही केईएम रुग्णालयात दाखल केले गेले आहे. फटाक्यांमुळे डोळे व शरीर भाजल्याने शिवमहा व प्रतीक हातमोडे या १० वर्षांच्या मुलांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.