मुंबई : शाहजहाननं मुमताझसाठी ताज महाल उभा केला आणि आज तो प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखला जातो. तर सावित्रीने सत्यवानाला मृत्यूनंतरही परत मिळवलं. त्यामुळेच प्रेमाची ताकद अतूट मानली जाते. आज अशीच एक गोष्ट. आजच्या काळातल्या सत्यवानाची. त्यानं त्याच्या पत्नीला पुनर्जन्म दिलाय.
ही गोष्ट आहे शकील आणि नाहीदची. मुंबईत ग्लोबल हॉस्पिटलमधल्या आयसीयूत अॅडमिट असलेली नाहीद अहमद आणि तिचे पती शकील अहमद. एका आठड्यापूर्वी शकील यांनी त्यांची पत्नी नाहीदला स्वतःची एक किडनी दिली. दोन वर्षांपूर्वी नाहीदला किडनी निकामी झाल्याचं कळलं. पण दोन वर्षांपासून शकील तिला किडनी देऊ शकले नाहीत. कारण शकीलच्या कुटुंबींयांचा याला विरोध होता. इतकंच नाही तर दुसरं लग्न कर असा सल्लाही शकीलना त्यांच्या घरच्यांनीच दिला.
भारतामध्ये किडनी दान करताना डोनरच्या कुटुंबीयांच्या परवानगीचं ऍफिडेव्हिट देणं बंधनकारक असतं. शकील यांचे आई-वडील, भाऊ-बहीण कुणीच यासाठी परवानगी देत नव्हते. उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये राहणा-या शकील यांनी लखनौ, दिल्ली, कोलकाता अशा शहरांत याबाबत चौकशी केली, पण सगळीकडे निराशाच झाली. नाहीदची तब्येत इतकी बिघडली की तिला डायलिसीसवर ठेवावं लागलं. अखेर मुंबईतल्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये स्टेट ऑथोरायझेशन कमिटीच्या परवानगीनं शकीलनं नाहीदला किडनी दिली.
शकीलच्या या निर्णयामुळे आज नाहीदला पुनर्जन्म मिळालाय. त्यामुळे शकीलबद्दल बोलताना तिला शब्दही अपुरे पडतायत. या केसमध्ये भावना आणि कायद्यात अडकलेल्या एका पेशंटचा जीव वाचवण्यात डॉक्टरांचा वाटा मोठा आहे.
लग्नातली सप्तपदी असो किंवा शकील आणि नाहीदच्या बाबतीत बोलायचं झालं तर निकाहच्या वेळी एकमेकांना त्यांनी कबूल म्हटलं असेल. पण त्यावेळेला दिली घेतलेली वचनं कशी पाळायची असतात, ते या दोघांनीही दाखवून दिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.