त्या अपघातानं तिघींची केली ताटातूट

दिवा - सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातानं अनेक कुटुंब उध्वस्त केली. त्यापैकीच एक नाकती कुटुंब. जयराम नाकती स्वतः गंभीर जखमी झालेत, त्यांच्या पत्नीचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. तर त्यांच्या तीन मुलींची एकमेकींपासून ताटातूट झालीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 6, 2014, 06:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दिवा - सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातानं अनेक कुटुंब उध्वस्त केली. त्यापैकीच एक नाकती कुटुंब. जयराम नाकती स्वतः गंभीर जखमी झालेत, त्यांच्या पत्नीचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. तर त्यांच्या तीन मुलींची एकमेकींपासून ताटातूट झालीय.
जयराम नाकतींनी पत्नी सुरेखा आणि तीन मुलींसह आपल्या गावी संगमेश्वरला जाण्यासाठी दिवा-सावंतवाडी ट्रेन पकडली. पण पुढ्यात काय वाढून ठेवलंय, याचा जराही अंदाज त्यांना नव्हता. दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातात या कुटुंबाची पुरती वाताहत झाली. स्वतः जयराम नाकते या अपघातात गंभीर जखमी झाले, तर त्यांची पत्नी जागीच ठार झाली. पण आश्चर्य म्हणजे नाकती यांच्या तीनही मुली या अपघातातून बचावल्यायत. विशेष म्हणजे अवघ्या तीन महिन्यांची मुलगीही सुखरुप आहे. तिच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या अपघातानंतर तीनही बहिणींची ताटातूट झालीय. नाकती यांच्या अडीच वर्षांच्या मुलीवर सायन हॉस्पिटमध्ये उपचार सुरू आहेत. चार वर्षांची जान्हवी या अपघातात गंभीर जखमी झालीय. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीय. तिच्यावर आधी रोह्याच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, पण नंतर तिला वाशीमधल्या एम. जी. एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तिथेही आधी पैसे भरा, मगच उपचार करु, असं सांगण्यात आलं.
या तिन्ही बहिणींचं मायेचं छत्र हरपलंय. वडीलही गंभीर जखमी आहेत. अशा विचित्र अवस्थेत तिघी बहिणींचीही एकमेकींपासून ताटातूट झालीय. सगळ्यात मोठी बहीण जेमतेम चार वर्षांची आहे. नकळत्या वयातच तिघींवर मोठा आघात झालाय, त्याची कल्पनाही या तिघींना नसावी. आता गरज आहे ती तिघींनाही खंबीर आधाराची. मानसिकदृष्ट्याही आणि आर्थिक दृष्ट्याही.
*या चिमुकल्यांना जर आपल्याला मदत करायची असेल तर खालील अकाऊंटवर तुम्ही आपली रक्कम, मदत पोहोचवू शकता...
Chalke Harishchabdra dharma (मुलींचे मामा)
Account No.- 37257
अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड
Ph. No.- हरिश्चंद्र चाळके - 08108842014
सोबतच L.T.G.M. Hospital, poor box charity Fund या हॉस्पिटलमधील फंडमध्येही तुम्ही दान करू शकता. जेणेकरून रेल्वे अपघातग्रस इतर कोणत्याही रुग्णाला तुम्ही मदत करू शकता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.