www.24taas.com, मुंबई
सोमवारी पहाटे फ्लायओव्हरवरून गॅसचा टँकर कोसळल्यानं भीषण अपघात घडलाय. अपघातानंतर टँकरनं पेट घेतल्यानं या अपघातानं रस्त्यावरच आगीचं रुद्र रुप धारण केलंय. ईस्टर्न एक्सप्रेस हाय-वेवर हा अपघात घडलाय. त्यामुळे चेंबुर-मानखुर्द रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झालीय. ही वाहतूक ठाण्याकडे वळविण्यात आलीय.
गॅस टँकर मानखुर्दजवळ फ्लायओव्हरवरुन कोसळल्याने ही आग लागली. या आगीत एक जण ठार तर २०हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. या टँकरमध्ये जवळपास २० टन एलपीजी गॅस असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळं मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १५ हून अधिक अग्निशमनच्या गाड्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलंय. ही आग इतकी भीषण आहे की ती आटोक्यात आणण्यासाठी २० तासाहून अधिक काळ लागण्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय.
दरम्यान, अपघातामधल्या जखमींवर सायन हॉस्पिलमध्ये उपचार सुरु आहेत. हा अपघात ज्या परिसरात घडला तिथून काही अंतरावर बीएआरसीच्या रिफायनरी आणि नागरी वस्ती आहे.