सेनेला कवेत घेत मंत्रिमंडळाचा विस्तार १ डिसेंबरला?

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार १ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली. 

Updated: Nov 22, 2014, 07:31 PM IST
सेनेला कवेत घेत मंत्रिमंडळाचा विस्तार १ डिसेंबरला? title=

मुंबई : राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार १ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली. 

भाजप प्रदेशाध्यक्षपदाबाबतही चर्चा झाल्याचं वृत्त आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी राम शिंदे यांचं आघाडीवर आहे. 

दरम्यान, 'शिवसेना कायम आमचा मित्र राहिला आहे. भविष्यातही आम्ही मित्र राहू’, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केलंय. विशेष म्हणजे ‘सामना’मध्येही मुख्यमंत्र्यांची स्तुती करण्यात आलीय. दरम्यान, शिवसेनेशी मैत्री कायम असल्याचं स्पष्ट करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी ‘नंबर गेम’मध्ये मात्र पिछाडीवर पडल्याचं मान्य केलंय.

मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सहभाग असेल असा विश्वास आज सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. शिवसेनेशी सत्ता सहभागाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचा दावा पाटील यांनी केलाय. शिवसेना उपमुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम होती. तर भाजपने ही मागणी फेटाळून लावत सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातूनही शिवसेनेने माघार घेतल्यामुळे संबंध जवळपास पूर्ण तुटले होते. त्यातच विधानसभेत विरोधीपक्ष नेतेपदी विराजमान होत शिवसेनेने आपले इरादेही स्पष्ट केले होते. 

पण, आत्ता लगेचच चित्र पालटलंय... एकीकडे भाजपच्या गोटात पुन्हा शिवसेनेविषयी ममत्व दाटून आल्याचं पाहायला मिळत असलं तर शिवसेनेकडून मात्र यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही. मात्र कोकण दौऱ्यावर असलेल्या उद्धव यांच्या बोलण्यातून मात्र ‘उम्मीद पे दुनिया कायम है’ असंच चित्र पाहायला मिळालं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.