मुंबई : गेल्या वर्षी रेल्वे दुर्घटनेत आपले पाय गमावणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्या टिळक हॉस्पीटल (सायन हॉस्पीटल) मध्ये मोफत उपचार करण्यात आले होते. याबद्दलच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर एका कोरियाच्या कंपनीनं हॉस्पिटलला 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' (सीएसआर) अंतर्गत २.५ करोड रुपयांचं मेडिकल उपकरण भेट देण्याचा निर्णय घेतलाय.
गेल्या वर्षी ४ मे रोजी दिवा - सावंतवाडी दरम्यान झालेल्या रेल्वे दुर्घटनेत तीन वर्षांची चिमुरडी समृद्धी गंभीर जखमी झाली होती. तिच्यासोबत तिचे कुटुंबीयही या दुर्घटनेत सापडले. तिच्या आईचा मृत्यू झाला होता. या घटनेत समृद्धीनं आपला डावा पाय गमावला होता. त्यानंतर समृद्धीची सगळी जबाबदारी सायन हॉस्पीटलनं उचलली होती. समृद्धीवर उपचार करण्यापासून ते तिला प्रोस्थेटिक पाय लावण्यापर्यंत सगळा खर्च सायन हॉस्पीटलनंच केला.
त्यानंतर, कोरियाची कंपनी 'सॅमसंग मेडिकल सिस्टम'नं हॉस्पीटलला रेडिओलॉजी मशिन्स, अल्ट्रासाऊंड मसीन्स, ड्युएल डिटेक्टर इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. बुधवारी या कंपनीच्या काही प्रतिनिधींनी हॉस्पीटलचा दौराही केला.
यावर 'सीएसआर' अंतर्गत हॉस्पीटल्सना अशी सुविधा मिळत असेल तर ही एक चांगली सुरुवात असेल, अशी प्रतिक्रिया सायन हॉस्पीटलचे डीन डॉ. सुलेमान मर्चेंट यांनी दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.