मुंबई : राज्य सरकारचा वर्षपूर्ती सोहळा पार पडला असला तरी शिवसेना मात्र 3 डिसेंबरला आपली वर्षपूर्ती साजरी करणार आहे. सत्तेत असूनही शिवसेना विरोधी पक्षासारखी वागतेय. आणि आता शिवसेनेचा वेगळा वर्षपूर्ती सोहळा त्यामुळे सरकारमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र नांदत असले तरी संसार मात्र काही सुरळीत चालत नसल्याचंच दिसत आहे.
वर्ष होत आलं तरी शिवसेनेचा सरकारविरोधी सूर किंचितही कमी झालेला नाही. उद्धव ठाकरेंचा दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा दौरा हे त्याचं ताजं उदाहरण. मुंबईतला एलईडी दिव्यांचा मुद्दा असो की, ग्रामीण मराठवाड्यातल्या दुष्काळ शिवसेनेनं आपल्याच सरकारला टार्गेट केलंय. इतर ठिकाणी झालेला भाजपचा पराभवही शिवसेनेला गुदगुल्या करणाराच होता.
खरं तर देशाच्या राजकारणात भाजप मोठा भाऊ, तर शिवसेना छोटा भाऊ आणि राज्याच्या राजकारणात शिवसेना मोठा भाऊ, तर भाजप छोटा भाऊ असं गेल्या २२ वर्षांचं समीकरण होतं. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते बुडीत निघालं. राज्यातही शिवसेना हिच छोटा भाऊ झाली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना चांगलंच जिव्हारी लागलं असेल.
शिवसेनेच्या ५ कॅबिनेट मंत्र्याना सन्मान नाही आणि ५ राज्यमंत्र्यांना अधिकार नाहीत असं रडगाणं वर्षभरापासून सुरु आहे. पदोपदी अपमानास्पद वागणूक मिळत असतानाही सत्तेतून बाहेर पडण्याची मानसिकता मात्र नाहीये. एकीकडे पक्ष फुटीची भीती तर दुसरीकडे सत्तेचे फायदे अशा पेचात पक्षनेतृत्व सापडलंय...
सत्तेचे फायदे उचलायचे आणि विरोधी पक्षाची भूमिकाही वठवायची असे शिवसेनेचे दोन्ही दगडावर पाय आहेत. लोकांना गृहित धरून शिवसेनेची गेल्या वर्षभरापासून वाटचाल सुरु आहे. लेकीन उद्धवजी, ये पब्लीक है ये सब जानती है !
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.