मुंबई : कोण म्हणतं स्वप्न पूर्ण होत नाही. सात वर्षाच्या चिमुकलीने एक मोठं स्वप्न पाहिलं आणि तिचं ते स्वप्न पूर्णही झालं. ही कहाणी आहे सात वर्षांच्या मेहेक सिंग या मुलीची. कॅन्सर पीडित असलेल्या मेहेकच्या आयुष्यात आजचा दिवस अविस्मरणीय ठरला. असं काय घडलं या चिमुरडीच्या आयुष्यात ?
पोलिसांच्या गाडीतून ऐटीत चालत येणारी मेहेक सिंग. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये ती आली. मेहेकला बोन कँसर आहे. तिच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मोठं होऊन पोलीस बनण्याचं तिचं स्वप्न आहे. पण कॅन्सरमुळं ते कितपत शक्य होईल, याची खात्री डॉक्टरांनाही नाही. भोईवाडा पोलिसांना हे कळलं, तेव्हा कठोर खाकी वर्दीतल्या मायाळू हृदयाला पाझर फुटला.
पोलीस अधिकारी बनण्याचं तिचं स्वप्न पोलिसांनी पूर्ण केलं. शुक्रवारी सकाळी पोलीस गणवेशात मेहेक पोलीस स्टेशनला आली. तिनं पोलीस स्टेशनची पाहाणी केली. इतकंच काय तर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या खुर्चीत बसून तिनं महत्त्वाचे फोन कॉल्स केले, केसेसही तपासल्या.
मेक अ विश या स्वयंसेवी संस्थेने मेहेकची ही इच्छा पोलिसांपर्यंत पोहचवली. भविष्यात मेहेकचं स्वप्न कदाचित पूर्ण होवू शकणार नाही. त्यामुळं तिला पोलीस बनवून आम्ही वेगळ्या पद्धतीनं व्हॅलेंटाईन डे साजरा केल्याचं पोलीस सांगतात.
एक दिवसासाठी का होईना, पोलीस होण्याचं मेहेकचं स्वप्न साकार झालं. कॅन्सरग्रस्त असतानाही तिला आपलं स्वप्न जगता आलं. तुम्ही देखील आपली स्वप्नं पूर्ण करण्याची जिद्द बाळगा. तुमचीही स्वप्नं नक्की साकार होतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.