मुंबई : एसटी प्रवाशांचे हाल होत असताना, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी अजब वक्तव्य केलंय. 'एक दिवस गैरसोय झाली तर काय बिघडलं? असा उलट सवाल त्यांनी केलाय.
एवढंच नव्हे तर 'संप झाला तेव्हा गैरसोय होतेच ना...?' अशा शब्दांत रावतेंनी समर्थनही केलंय. शिवसेनाप्रमुख बाबासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त मुंबई सेंट्रल बस स्थानक बंद राहणार आहे. एकही गाडी येथून सुटणार नसल्याने प्रवाशांचे हाल होणार आहे.
तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाचा भपकेबाज कार्यक्रम मुंबई सेंट्रलवर आयोजित करण्यात आलाय. विशेष म्हणजे संपूर्ण स्थानक बंद करून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळं पहिल्यांदाच मुंबई सेंट्रल बस स्थानक बंद करून दाखवण्याचा विक्रम शिवसेनेच्या परिवहन मंत्र्यांनी केलाय. प्रवाशांना कोणतीही कल्पना न देता तयारीसाठी दुपारपासून अनेक गाड्यांची ये-जा बंद करण्यात आली.