भ्रष्टाचार न करण्याचा ‘मनसे’ वर्ल्ड रेकॉर्ड?

मुंबईतील घाटकोपरमध्ये गरबा खेळण्यासाठी आलेल्या ३० हजार नागरिकांनी एकाच वेळी मेणबत्ती पेटवून भ्रष्टाचार करणार नाही, अशी शपथ घेतली. हा एक जागतिक विक्रम असल्याचा दावा राम कदम यांनी केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 23, 2012, 10:58 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईतील घाटकोपरमध्ये गरबा खेळण्यासाठी आलेल्या ३० हजार नागरिकांनी एकाच वेळी मेणबत्ती पेटवून भ्रष्टाचार करणार नाही, अशी शपथ घेतली. हा एक जागतिक विक्रम असल्याचा दावा राम कदम यांनी केलाय. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रकॉर्डमध्ये होण्यासाठीही ते प्रयत्न करणार आहेत.
मनसे आमदार राम कदम यांच्या संकल्पनेतून एका अनोख्या विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला गेला. घाटकोपर पूर्वेतल्या पोलीस परेड मैदानात एकाच वेळी 30 हजार नागरिक गोळा झाले होते. या नागरिकांनी भ्रष्टाचार न करण्याची आणि भ्रष्टाचाराला खतपाणी न घालण्याची शपथ घेतली. तसेच पशूहत्या न करण्य़ाचीही शपथ घेतली. या सोहळ्याची दृश्य गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सला पाठवण्यात येणार आहेत. याअगोदर तीन हजार लोकांनी एकाच वेळी राष्ट्रध्वज हातात घेऊन शपथ घेण्याचा विक्रम आहे.