'सुपरस्टार'च्या कुटुंबीयांनी सोडला 'आशीर्वाद'चा ताबा...

सुपरस्टार राजेश खन्ना यांचा प्रतिष्ठित आणि वादग्रस्त बंगला ‘आशीर्वाद’ अखेर विकला गेलाय. राजेश खन्ना यांच्या कुटुंबीयांनी आपलं सगळं सामान या बंगल्यातून हलवून हा बंगला रिकामा केलाय. 

Updated: Aug 29, 2014, 04:34 PM IST
'सुपरस्टार'च्या कुटुंबीयांनी सोडला 'आशीर्वाद'चा ताबा... title=

मुंबई : सुपरस्टार राजेश खन्ना यांचा प्रतिष्ठित आणि वादग्रस्त बंगला ‘आशीर्वाद’ अखेर विकला गेलाय. राजेश खन्ना यांच्या कुटुंबीयांनी आपलं सगळं सामान या बंगल्यातून हलवून हा बंगला रिकामा केलाय. 

राजेश खन्ना यांच्या कुटुंबीयांनी हा बंगला व्यावसायिक असलेल्या शक्ती शेट्टी यांना विकलाय... दोन दिवसांपूर्वीच शेट्टी यांनी या बंगल्याची देवाण-घेवाणच्या तांत्रिक बाबी पूर्ण केल्या. 

वांद्र्याच्या कार्टर रोड स्थित हा बंगला 90 करोड रुपयांना विकला गेलाय. मुंबईतील ‘मिड डे’ या वर्तमानपत्रानं ही बातमी दिलीय. या बातमीनुसार, 602 वर्ग मीटरच्या प्लॉटवर बनविला गेलेला हा बंगला ‘ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड’चे चेअरमन आणि एमडी शक्ती शेट्टी यांनी विकत घेतलाय. परंतु, त्यांनी या बंगल्याची खरेदी किंमत सांगण्यास मात्र नकार दिलाय... शिवाय ते या घरात कधी प्रवेश करणार याबाबतही त्यांनी निश्चित माहिती दिलेली नाही.  

राजेश खन्ना यांचे बिझनेस पार्टनर प्रकाश यांनी मात्र ‘काकांचा’ हा बंगला विकला गेल्याचं आपल्याला दु:ख झाल्याचं म्हटलंय. पण, काकाजींची मुलं या बंगल्याचे उत्तराधिकारी आहेत... त्यांना हा बंगला विकण्याचं पूर्ण हक्क असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

या बंगल्याच्या रजिस्ट्रेशनच्या वेळी राजेश खन्ना यांची पत्नी डिंपल कपाडिया आपल्या दोन्ही मुली – ट्विंकल आणि रिंकीसोबत उपस्थित होत्या. तर शेट्टी आपल्या पत्नीसहीत उपस्थित होते.  

‘आशीर्वाद’ या आपल्या सुपरहीट सिनेमाच्या यशानंतर राजेश खन्ना यांनी हा बंगला विकत घेतला होता. राजेश खन्ना यांना हा बंगला अभिनेते राजेंद्र कुमार यांनी 1970 मध्ये तीन लाख रुपयांना विकला होता. 

उल्लेखनीय म्हणजे, राजेंद्र कुमार यांना हा बंगला अजिबात भाग्यशाली ठरला नव्हता. बंगला विकत घेतल्यानंतर त्यांचे चित्रपट आपटत राहिले... तर याविरुद्ध राजेश खन्ना यांना मात्र हा बंगला खूप ‘लकी’ असल्याचं ते मानत होते. या घरात वास्तव्यात असतानाच त्यांचे एकापाठोपाठ एक असे 15 चित्रपट हिट झाले होते.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.