‘...तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून परीक्षा घ्या’

प्राध्यापकांचा बहिष्कार असला तरी महाविद्यालयांना परीक्षा घेण्याचे आदेश देत, गरज पडल्यास पोलीस बळाचा वापर करा अशी कठोर भूमिका सरकारने घेतलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 22, 2013, 09:22 AM IST

www.24taas.com, मुंबई
संपकरी प्राध्यापकांना उत्तर देत सरकारने परीक्षा घेण्यासंदर्भात नवीन अध्यादेश काढलाय. प्राध्यापकांचा बहिष्कार असला तरी महाविद्यालयांना परीक्षा घेण्याचे आदेश देत, गरज पडल्यास पोलीस बळाचा वापर करा अशी कठोर भूमिका सरकारने घेतलीय.
गेल्या ४५ दिवसांपासून राज्यभरात सुरु असलेल्या प्राध्यापकांच्या मागण्यांसंदर्भात कोणताही तोडगा निघाला नाही. महाविद्यालयांमध्ये एफवाय आणि एसवायच्या परीक्षा सुरु आहेत. तसंच २८ मार्चपासून टीवाय बीकॉमची परीक्षाही सुरु होणार आहे. त्यामुळेच अखेर सरकारनं कठोर भूमिका घेत परीक्षा घेण्याबाबत अध्यादेश काढलाय. वेळ पडल्यास बेरोजगार आणि शिक्षकेतर कर्मचा-यांकडून परीक्षा घेण्यात घ्या, गरज पडल्यास पोलीस बळाचा वापर करा, प्राध्यापकांनी अडथळा आणला तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा असे आदेशच सरकारनं दिलेत.

मात्र, या सगळ्यामुळे निकालाच्या गुणवत्तेवर परिणाम होणार असल्याचा आरोप एमफुक्टोनं केलाय. गुरुवारी झालेल्या सिनेट बैठकीत विद्यापीठाने टीवाय बीकॉमच्या परीक्षा नियोजित तारखेनुसार होणार असल्याचं म्हटलंय. मात्र, परीक्षा विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलली तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी दिलाय.
सरकारचा दबाव, प्राध्यपकांची आडमुठी भूमिका आणि विद्यार्थ्यांचं हित या सगळ्या पार्श्वभूमीवर परीक्षा यशस्वी करुन दाखवणं म्हणजे विद्यापीठालाच परीक्षा द्यावी लागणार आहे.