`आधार`ला निर्माण झालीय आधाराची गरज!

केंद्रसरकारच्या 'आधार' योजनेमुळं गरिबांना ‘आधार’ मिळणं तर सोडाच पण आधारकार्ड काढण्यासाठी सामान्यांच्या डोक्याचा ताप मात्र नक्कीच वाढलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 14, 2013, 04:59 PM IST

www.24taas.com, मुंबई
केंद्रसरकारच्या 'आधार' योजनेमुळं गरिबांना ‘आधार’ मिळणं तर सोडाच पण आधारकार्ड काढण्यासाठी सामान्यांच्या डोक्याचा ताप मात्र नक्कीच वाढलाय.
बँकांपासून ते पासपोर्ट काढण्यापर्यंत आधारची सोय होईल अशा केंद्र सरकारच्या घोषणांनंतर आधारकार्ड मिळवण्यासाठी नागरिकांनी धावधाव सुरू केलीय. पण, खरी परिस्थिती पाहता नागरिकांच्या संख्येला पूरक अशी आधार केंद्र मात्र स्थापन करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सर्वच आधार केंद्रांवर गर्दी, हाणामारी आणि गोंधळाचं वातावरण दिसून येतंय. काही ठिकाणी तर या केंद्रांवरील खासगी एजन्सी कर्मचाऱ्यांची सुरक्षेसाठीच पोलिसांचा ‘आधार’ घ्यावा लागताना दिसतोय.
आधार नाही तर तुम्ही निराधार अशी वातावरणनिर्मिती करण्यात आल्यानं नागरिक थंडीमध्ये रात्रीपासूनच केंद्रांवर रांगा लावताना दिसत आहेत. तर केंद्रावर मात्र एका दिवशी केवळ तीस लोकांचीच आधारसाठी नोंद होत आहे. नियमानुसार अपॉइंटमेंटची तारीख एक महिन्यापेक्षा जास्त असू नये, परंतू काही ठिकाणी नागरिकांना नोंदणीसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातील तारिख देण्यात येतेय तर काही ठिकाणी मात्र तारिखच उपलब्ध नसल्याचं कारण सांगण्यात येतंय. काही केंद्रांवरील संगणक यंत्रणा बंद आहेत तर काही केंद्रांवर कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. काही एजन्सीच्या संगणकांतील सॉफ्टवेअर सदोष आहे. त्यामुळे कधी कधी लहान मुलं आणि वृद्धांच्या अंगठ्यांचे ठसेच उमटत नाहीत. मग, हेलपाटे आलेच. याचा परिणाम वृद्ध, गर्भवती, लहान मुले, अपंग यांना चांगलाच सोसावा लागतोय.

‘आधार’चा अर्ज भरण्यासाठी uidai.gov.in या वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली मात्र तारखा उपलब्ध नसल्यानं या वेबसाईटवर अर्ज स्वीकारलाच जात नाही... हेल्पालाईनचाही उपयोग होत नाही त्यामुळे आधारच्या हेल्पलाईनलाही आता ‘आधार’ लागणार असं दिसतंय.