www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाने केलेल्या हल्ल्यात दुसरा रुग्ण ठार झालाय. या हल्ल्यात आणखी दोन रुग्ण जखमी झालेत. याप्रकारामध्ये हॉस्पिटलमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हल्लेखोर रुग्णाचे नाव शहाबुद्दीन मोहबली तालुकादार ( ४२) आहे. शहाबुद्दीन हा आग्रीपाड्याचा रहिवासी असून, मेंदूतील क्षय आणि अन्य दुर्धर रोगावरील उपचारांसाठी तो ८ मे रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्याला जनरल वॉर्डमध्ये दाखल करून घेण्यात आले होते. त्याच्या विविध चाचण्या सुरू होत्या. पहाटे सहाच्या सुमारास शहाबुद्दीन शौचालयात गेला. तेथून परतताच अचानक तो हिंसक झाला. बेडजवळचा सलाइनचा स्टॅण्ड घेऊन तो आसपासच्या रुग्णांवर धावून गेला. या हल्ल्यात एक जण ठार झाला.
लीलाबिहारी गोवर्धन ठाकूर यांच्यावर हल्ला केल्याने त्यांचा त्या मृत्यू झाला. ठाकूर यांच्या डोक्यात आणि चेहर्यावर लोखंडी स्टॅण्डचे घाव घातले. ठाकूर हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर प्रफुल्लचंद लिवनलाल परमार यांच्यावर हल्ला केला. मेंदूचा क्षय आणि अन्य दुर्धर रोगाची लागण झालेल्या हा माथेफिरू रुग्ण होता, अशी माहिती पुढे आली आहे.
हल्ल्यानंतर शहाबुद्दीनला तत्काळ जे. जे. रुग्णालयाच्या मानसोपचार विभागात हलविण्यात आले. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंद झाला असला तरी रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.