www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
नवी मुंबईतील वाशी पोलिसांनी 11 लाख रूपयांची रोकड बाळगल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. या रकमेचा निवडणुकांशी काही संबंध आहे का?, याचा तपास पोलीस करत आहेत.
सध्या या तरूणाला आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
वाशी पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी कोपरी येथे ही कारवाई केली. शहरात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्यानुसार मतदारांना लुभावण्याकरीता उमेदवारांकडून पैशांचं वाटप होतोय का ? यावर पोलिसांचे लक्ष आहे.
या करीता शहरात ठिकठिकाणी पोलिसांतर्फे वाहनांची देखील तपासणी केली जात आहे.
अशाच तपासणी दरम्यान कोपरी येथे एका कार क्रमांक एम एच- 43- एबी- 8251 मध्ये मोठय़ा प्रमाणात रोकड आढळून आली. यावेळी पोलिसांनी कारमधील अशोक अय्यप्पा पक्काल्ला वय 47 यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी पंचनाम्याच्या दरम्यान रक्कम मोजली असता ती 11 लाख रुपये ईतकी निघाली. अशोक हे हॉटेल व्यवसायिक असून कामोठे येथील राहणारे आहेत.
ही रक्कम वाशी सेक्टर 10 येथील आपल्या भावाला घर बांधणीकरीता द्यायला चाललो होतो, असे अशोक यांनी पोलिसांना सांगितले आहे. परंतु ही रक्कम कोणत्या राजकीय पक्षाची आहे का ? यासंबंधीचा अधिक तपास वाशी पोलिस करत आहेत.
त्यानुसार अशोक यांच्याकडील रकमेच्या चौकशीसाठी आयकर विभागाने त्यांना ताब्यात घेतले असून, पुणे येथे त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.