www.24taas.com, मुंबई
आज बाहेर पडलात आणि हवेत थोडी गर्मी जाणवली तर तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं कॅलेंडर बघा! अहो, असं काय करताय, आज १ ऑक्टोबर... ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस ना! मग, ऑक्टोबर हीट सुरू झालं नाही का…
खरं म्हणजे हवेतील ही गर्मी गेल्या काही दिवसांपासून थोडी थोडी जाणवतेय पण, ऑक्टोबर उजाडला म्हटल्यावर साहजिकच पहिली आठवण होते ती खरोखरंच आपण उकडतोय असं वाटायला लावणाऱ्या ‘ऑक्टोबर हीट’ची... मुंबईतील पारा ३४ अंशांवर पोहचलाय. तर एरव्ही ६०-६५वर असणारी आर्द्रताही ९५ टक्क्यांवर पोहोचलीय. मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय. येत्या दोन दिवसांत मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात हलका पाऊस पडेल, असं समजतंय. पण, त्यामुळे हवेतील गरमी कमी होणार नाही तर आणखीन वाढणार आहे.
महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील मान्सूनचा प्रभाव आता ओसरलाय. त्यामुळे भूभागासह किनारपट्टीवरील तापमान वाढू लागलंय. समुद्रकिनारपट्टीवरील वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागले. ही बाष्पीयुक्त हवा समुद्रावरून भूभागाच्या दिशेने वाहू लागल्याने मुंबईसह किनारपट्टीवरील परिसरातील हवेतील आर्द्रता वाढल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.